नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई व राज्याचे दोनदा महाधिवक्ता राहिलेले दिवंगत विधिज्ञ अरविंद बोबडे यांच्या धर्मपत्नी मुक्ता बोबडे यांचे मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकातील राहत्या घरी अल्प आजारामुळे निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. (Chief Justice Sharad Bobade)
त्या वृद्धापकाळामुळे आजारी होत्या. त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते. परंतु, त्यांनी सोमवारपासून उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. दरम्यान, मध्यरात्रीनंतर तब्येत अधिक खालावून त्यांची प्राणज्योत मालवली. त्या गृहिणी होत्या, बोबडे कुटुंबाचा भक्कम आधार होत्या. त्यांनी तब्येत चांगली असेपर्यंत कुटुंबाचा सक्षमपणे सांभाळ केला. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शरद बोबडे यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देण्यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये त्या आवर्जुन उपस्थित होत्या. शरद बोबडे शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या चरणी नतमस्तक झाले होते. त्यांच्या निधनामुळे बोबडे कुटुंबाचा मोठा आधार हिरावला गेला आहे.
त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता मोक्षधाम घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. सुनील शुक्रे, न्या. रोहित देव, न्या. अनिल किलोर, माजी न्या. रवी देशपांडे, माजी न्या. झेड. ए. हक यांच्यासह वकील मंडळी, मित्र परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येत उपस्थित होते.