लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकता : नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चार तासांत तेरा मंदिरांना भेटी आणि जाहीर सभेत मतदारांना देवीपाठ ऐकविणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुरुलिया येथे व्हीलचेअरवरून प्रचारसभा घेताना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाची खिल्ली उडवली.
ममता दीदींच्या या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांमागे दोन हेतू मानले जात आहेत- पहिला मुस्लिम लांगूलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने हिंदू लोकसंख्या अधिक असलेला टापू असून गेल्या दोन निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे.
नंदीग्राम येथे गर्दीत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी दोन दिवस इस्पितळात काढले. त्यानंतर काल, रविवारी त्यांनी कोलकता शहरात व्हीलचेअरवरून रोड शो केला. सोमवारी त्यांनी तीनशे किलोमीटर दूर पुरुलिया येथे व्हीलचेअरवरूनच प्रचारसभा घेतली. त्या सभेत भाजपच्या रथयात्रेची खिल्ली उडविताना ममता बॅनर्जी यांना जगन्नाथांच्या रथाची आठवण झाली. आपणही भाजप नेत्यांइतकेच हिंदू आहोत, हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता.
हिंदूबहुल दक्षिण बंगाल तृणमूलचा बालेकिल्ला
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *विधानसभेच्या २९४ पैकी तब्बल १६७ जागा नादिया, पूर्व व पश्चिम वर्धमान, हुगळी, उत्तर व दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, हावडा व कोलकाता या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दक्षिण बंगालमध्ये आहेत. जंगलमहल प्रदेश मिळून दक्षिणेकडे दोनशे विधानसभा मतदारसंघ आहेत.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *हा टापू ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलने पीछेहाट होऊनही १६४ विधानसभा जागांवर आघाडी मिळवली. त्यापैकी दक्षिण बंगालमधील जागा ११९ आहेत.
* भाजपचे अठरा खासदार विजयी झाले, तर १२१ विधानसभा जागांवर आघाडी मिळाली. त्यात उत्तर बंगाल, दार्जिलिंग टेकड्या व जंगलमहलमधील ९४ पैकी ६७ जागी भाजपला आघाडी होती.
* मध्य बंगालमधील ५६ टक्के मुस्लिम मतदारांच्या तुलनेत दक्षिण बंगालमधील मुस्लिम मतदारांचे प्रमाण अवघे २४ टक्के इतकेच आहे. त्यामुळेच या भागात ममता बॅनर्जी यांनी हिंदू अवतार धारण केला आहे.