नागपूर : उपराजधानीत होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षातर्फे महाल झोन येथे ‘मटका फोड’ आंदोलन करण्यात आले. शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा व सार्वजनिक नळ पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणीदेखील करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून दसरा रोड महाल भागात आणि शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली पाण्याचा अल्प पुरवठा सुरू आहे. दसरा रोड महाल भागातील सार्वजनिक नळ महानगरपालिकेने बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा होत नसून नागरिकांची गैरसोय सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अपुरा पाणीपुरवठा करून खासगी टँकरनी पाणीपुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी महाल झोन मध्ये ‘मटका फोड’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘आप’चे मध्य नागपूर संघटनमंत्री प्रभात अग्रवाल, गिरीश तितरमारे, विजय धकाते, दीपक भातखोरे उपस्थित होते.