नागपूर : महापालिकेच्या काही चुकांमुळे शहराच्या बाह्य भागात होणाऱ्या बोअरवेलचे काम रखडले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बोअरवेल खोदले जाण्याची शक्यताही कमीच आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील बाह्य भागात ३१३ बोअरवेल खोदण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. मात्र महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावात महापालिकेचा वाटाही दाखविला नाही, तसेच भूजल सर्वेक्षण व विकास विभागाचे प्रमाणपत्रही दिले नाही. त्यामुळे संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. आता या योजनेसाठी महापालिकेच्या वाट्याला येणाऱ्या १० टक्के रकमेची तरतूद करण्याचा प्रस्ताव १८ मे रोजी महापालिकेच्या सभेत येणार आहे.ज्या भागात जलवाहिनी नाही अशा भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १५० मि.मी. तसेच ११५ मि.मी. व्यासाचे बोअरवेल खोदण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिले होते. यानंतर २१३ बोअरवेल खोदण्याचा १ कोटी ३७ लाख ५१ हजार २२८ रुपयांचा प्रस्ताव तयार करून सरकारला सादर करण्यात आला. अशाचप्रकारे पूर्व नागपूरच्या बाह्य भागासाठी ९० बोअरवेलसाठी ५७ लाख २८ हजार ९२० रुपयांचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले. या प्रस्तावात महापालिकेला १० टक्के वाटा द्यायचा होता, मात्र महापालिकेने प्रस्तावात हे स्पष्ट केले नाही. त्याचप्रकारे बोअरवेलची जागा व भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रमाणपत्रदेखील जोडले नाही. त्याच कारणामुळे मार्चच्या शेवटी संबंधित प्रस्ताव महापालिकेला दुरुस्तीसाठी परत करण्यात आला.महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने अचूक प्रस्ताव पाठविला असता तर उन्हाळ्यात शहराच्या बाह्य भागात बोअरवेलचे खोदकाम झाले असते. हजारो नागरिकांना त्याचा फायदा झाला असता. (प्रतिनिधी)
मनपाच्या चुकीने रखडले बोअरवेलचे काम
By admin | Published: May 13, 2015 2:44 AM