जयंतीदिनी केलेले हृद्य स्मरण
नागपूरः 'वक्तादशसहस्त्रेषु राम शेवाळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला असलेले आयाम पहायला गेलं तर आपण अचंबित होऊन जावं असं दर्शन घडतं. ते उत्तम लेखक, कवी, आचार्य, संपादक, निवेदक, मैफल रंगविणारे मित्र, विविध प्रकारच्या संमेलनांचे आदर्श संयोजक, निर्भय साहित्यिक, प्रकाशपूजक, सत्य, शिवं सुंदराचे उपासक, महाराष्ट्र आचार्यकुलाचे संयोजक, चांगले गायक व नकलाकार आणि प्रखर राष्ट्रभक्त अशी अनेक उत्तरे त्यांच्या सहवासात आलेल्यांकडून त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार येतील. या त्यांच्या सर्व गुणविशेषांचा मी ४४ वर्षे भाग्यवान साक्षीदार राहिलो आहे.
राम शेवाळकर(आम्ही वणीकर त्यांना नानासाहेब म्हणत असू.) वणीत १९६५ मध्ये प्राचार्य म्हणून आले. आमची जुनी काहीही ओळख नव्हती. वणीतील एका शाळेत मी साधा शिक्षक होतो. वक्ता म्हणून मी त्यांचे नाव ऐकून होतो. त्यामुळे आल्या आल्या त्यांना मी माझ्या शाळेत एका कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून आमंत्रित केले. पूर्वपरिचय नसतांनाही त्यांनी आमंत्रण कसलेही आढेवेढे न घेता स्वीकारले. ती आमची पहिली ओळख. वणीत प्राचार्य म्हणून रुजू झाल्यावर स्थानिक साहित्य संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे चालून आले. त्या संदर्भात त्यांनी मला तुकाराम बीजेला तुकारामावर बोलण्याविषयी सुचविले. 'तुका झालासे कळस ' हा विषय देऊन मी ती सूचना मान्य केली. तेव्हा पासून त्यांनी अंगिकारलेल्या प्रत्येक उपक्रमात मला अग्रक्रमाने सहभागी करुन घेतले. हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे १९६५ पासून तो त्यांनी शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या दुर्दैवी क्षणाचा मी साक्षीदार आहे. २००१ मध्ये निव्रुत्त झाल्यानंतर शेवटपावेतो मी त्यांच्या राज्यभरातील व्याख्यानांच्या दौऱ्यात त्यांच्या सोबत होतो. ४४ वर्षे त्यांचा निकटचा सहवास लाभला हे माझे पूर्व संचितच म्हटले पाहिजे.
त्यांच्या विद्वत्तेची व वक्तृत्वाची जनमानसावर मोहिनी तर निश्चितच होती परंतु तद्वतच कोणालाही आपल्या पहिल्या भेटीतच आपलेसे करण्याएवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. या त्यांच्या स्वभावामुळेच प्रवासातील त्यांचे सहप्रवासी त्यांचे कुटुंबीय होऊन जात. यामुळेच भारतरत्न लतादीदी त्यांना आपले आप्त मानीत. माझे त्यांच्या सोबतच्या प्रवासातील अनुभव सांगतो, ते ज्या घरी मुक्कामाला असत त्यांना ते दिवस दसरा, दिवाळी सारखे वाटत आणि त्यांना निरोप देतांना घरच्यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले असत. आपल्या घराला त्यांचा पदस्पर्श व्हावा म्हणून दुसऱ्या मजल्यावर राहणारे त्यांचे चाहते त्यांना खुर्चीवर बसवून आपल्या घरी नेत. समाजाच्या विविधस्तरातील गुणीजनांच्या अलोट प्रेमाचे ते धनी होते. प्रत्यक्षात सत्पुरुष असूनही ते लहान मोठयांना आपले वाटत. स्वामी गोविंददेव गिरी तर म्हणत, मंत्रदीक्षा देण्याचे आपण अधिकारी आहात. संत साहित्यिक ही संकल्पना आहे की नाही, मला माहिती नाही परंतु ते संत साहित्यिक होते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील असंख्य घरात त्यांनी सद्भावनेची व सुसंस्कारांची ज्योत चेतवली. त्यांची विद्वत्ता विनयाने अधिक शोभून दिसत होती. विस्तारभयास्तव एका वाक्यात मी एवढेच म्हणेन की नानासाहेब (शेवाळकर ) पुरुषाचा देह लाभलेली ' माऊली ' होती .
माधव सरपटवार, वणी, यवतमाळ.