नागपूर : रस्त्यावर अपघातात जखमी, अपंग किंवा आजारी असलेल्या मुक्या श्वानांना पाहून फारफार तर कळवळा व्यक्त करून माेकळे हाेणाऱ्यांची कमतरता नाही. मात्र, अशा जखमी श्वानांच्या उपचारापासून त्यांची नेहमीसाठी सेवासुश्रूशा करणारे स्मिता मिरे हे औलिया व्यक्तिमत्त्व शहरात आहे. त्यांनी मुक्या प्राण्यांच्या सेवेत ईश्वर शाेधला. हजाराे आजारी, जखमी श्वानांचा स्वखर्चाने उपचार त्यांनी केला व शेकडाे श्वानांच्या जखमांवर मातेसमान फुंकर घातली; पण म्हणतात ना, ‘जया अंगी माेठेपण, तया यातना कठीण.’ आता या सेवाकार्यासाठी त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागता आहे.
स्मिता यांना अगदी बालपणापासून मुक्या प्राण्यांचा कळवळा. कळायला लागले तसे २००५ पासूनच प्राण्यांच्या सेवेचे व्रत त्यांनी घेतले. गाय, म्हैस असाे की कुत्रे, रस्त्यावर अपघातात जखमी, अपंग झालेल्या या प्राण्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी त्या सर्वताेपरी प्रयत्न करतात. कुत्रे जखमी आढळले की त्यांना घरी आणायचे, उपचार करायचा आणि ताे बरा हाेईपर्यंत घरीच सेवा करायची. असे करीत घरी २०-२५ कुत्रे जमा झाले हाेते. त्यामुळे साेसायटीतील रहिवाशांच्या राेषाचा सामना त्यांना करावा लागला. नागरिकांच्या तक्रारीमुळे २०१३ मध्ये या जखमी श्वानांसाठी हजारी पहाड, काटाेल नाका येथे भाड्याने जागा घेत स्वतंत्र शेल्टर हाेम सुरू केले. त्या काळात त्यांचा ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय बऱ्यापैकी चालत हाेता.
काही नि:स्वार्थ सहकाऱ्यांची टीम तयार झाली. ‘सेव्ह स्पीचलेस आर्गनायझेनशन’ ही एनजीओ त्यांनी स्थापन केली. शहरात कुठेही जखमी पडलेल्या, अपंग झालेल्या श्वानाची माहिती दिली की त्याला स्वखर्चाने उचलून उपचार करायचा व शेल्टर हाेममध्ये आसरा द्यायचा. अपघातग्रस्त, भाजलेले, पॅरालाइज झालेले, कॅन्सरग्रस्त, अपंग असे १२८ कुत्रे सध्या त्यांच्या शेल्टर हाेममध्ये आहेत आणि त्या व त्यांचे सहकारी अगदी प्रेमाने त्यांची सेवा करतात. आतापर्यंत हजाराे श्वानांवर त्यांनी उपचार केले, तर २००० श्वानांची नसबंदी केली. या कार्यात महापालिका किंवा कुठलीही शासकीय मदत त्यांना मिळाली नाही. मात्र, आता काेराेना व लाॅकडाऊनमुळे त्यांचा स्वत:चा व्यवसाय दाेन वर्षांपासून बंद असल्याने या कार्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना त्यांना करावा लागता आहे.
महिन्याचा खर्च लाखाच्या घरात
शेल्टरच्या जागेचे भाडे १० हजार रुपये आहे. या श्वानांसाठी महिन्याला २००० किलाे तांदूळ, २५-३० हजाराचे डाॅगफूड, दरराेज १० लिटर दूध, औषधाेपचार, एक्स-रे, किमाेथेरपी, लसीकरण असा सर्व खर्च लाखाच्या घरात आहे. आतापर्यंत त्यांनी केलाही. मात्र, आता व्यवसाय बंद पडल्याने डाॅक्टर, धान्य दुकानदार, औषधी विक्रेता यांच्या कर्जाचा डाेंगर त्यांच्यावर चढला आहे. पाण्याचे टँकरही मिळत नसून पाण्याची व्यवस्था करायला त्रास साेसावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फार तर पुढचे ६ महिने शेल्टर चालविणे शक्य हाेईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
येथे करा मदत
- आपण हजारी पहाड, काटाेल नाका येथील ‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या शेल्टरला भेट देऊ शकता.
- इंडियन बँक, मानेवाडा शाखा : सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन : खाते क्रमांक 6461521662, आयएफएससी काेड आयडीआयबी ०००एम३१३ या खात्यावर मदत जमा करू शकता. किंवा स्मिता मिरे यांच्याशी संपर्क साधू शकता.