लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटमार करणाऱ्या एका इसमाला मेयोच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंगीचे औषधे मिळाली. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सतर्कता पाळण्याचे आवाहन ‘एमएसएफ’चे वरिष्ठ सुपरवायजर अधिकारी रमेश सिंग यांनी केले.प्राप्त माहितीनुसार, कार्तिक कुवरलाल कटरे (१९) रा. गोंदिया गोरेगाव हा हिंगणा येथील बहिणीला भेटून १९ एप्रिल रोजी नागपूरला आला होता. मध्यवर्ती रेल्वे स्थानकाकडे पायी जात असताना लोहापूल येथे बाईकवर स्वार असलेल्या दोन इसमाने त्याला थांबविले. यातील एक इसम ज्ञानेश्वर पेशने (५५) याने कार्तिकला कुठे जात आहे, अशी विचारपूस करीत आम्हीही गोंदियाचे रहिवासी आहोत,अशी भूलथाप दिली. सोबत चालण्याचा आग्रहही केला. कार्तिकने त्याच्यावर विश्वास ठेवून बाईकवर स्वार झाला. मेयोच्या मुख्य द्वाराजवळ आल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वरने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून उतरला. परत येताना त्याने तीन शीतपेयाच्या बॉटल्स आणल्या. त्याच्यासमोर तेदोघे शीतपेय प्याले. कार्तिकही शीतपेय प्याला. नंतर तिघेही बाईकने समोर निघाले. पारडी (तिरोडी) येथे येतपर्यंत कार्तिक बेशुद्ध झाला. त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून त्याला शेतात टाकून दोघेही पसार झाले. सायंकाळी कार्तिक शुद्धीवर येताच झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला. गावकऱ्यांच्या मदतीने बहिणीला फोन लावला. बहिणीने मावसभावाला याची माहिती दिली. मावसभावाने तातडीने कार्तिकला गाठले. कार्तिकची प्रकृती खालावली असल्याने त्याला मेयोमध्ये भरती केले. २० एप्रिल रोजी सकाळी त्याला रुग्णालयातून सुटी मिळाली. रुग्णालयाच्या ओपीडी बाहेर नातेवाईकांसोबत कार्तिक बोलत असताना अचानक त्याला समोर आरोपी ज्ञानेश्वर आढळून आला. कार्तिकने आरडाओरड करताच आरोपी पळायला लागला. एमएसएफच्या जवानांच्या ही बाब लक्षात येताच मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले. झालेला प्रकार जाणून घेतल्यावर आरोपीची तपासणी केली. त्याच्या खिशात गुंगीच्या औषधासोबतच इतरही औषधे आढळून आली. जवानांनी आरोपीला तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले.गुंगीचे औषध देऊन लुटमार करणारा मेयोच्या परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा एमएसएफचे जवान सतर्क राहत असल्याचे समोर आले. वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी जवानांचे कौतुक केले. ही कारवाई एमएसएफचे एसएसओ रमेश सिंग यांच्या मार्गदर्शनात आकाश मोहोड, दिलीप लांबट, ओम चौधरी, मुकेश तारु यांनी केली.