नागपूर : विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या सामान्य रुग्णांना मेयो, मेडिकलने रुग्णालयातून सुटी देण्याचा सपाटा चालविला आहे. संप सुरू होण्यापूर्वी दोन्ही रुग्णालये मिळून अडीच हजारांवर रुग्ण भरती असताना सध्या हजारही रुग्ण भरती नाहीत. परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या संपामुळे गरीब व सामान्य रुग्णाचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मेयो, मेडिकलसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय व कामगार विमा रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. या तीन दिवसांत नियोजित जवळपास ४५० वर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. संप आज किंवा उद्या मिटेल या आशेवर भरती असलेल्या रुग्णांना अखेर गुरुवारी रुग्णालयातून सुटी देणे सुरू केले. यामुळे इतरवेळी फुल्ल असलेल्या वॉर्डात सध्या चार-पाच रुग्ण दिसून येत आहेत.