नागपूर : इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वाॅर्ड ते ऑपरेशन थिएटरपर्यंत कर्मचारी आणि परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णाच्या उपचार सेवांवर परिणाम होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसात मेयोत डॉक्टरांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये रोष आहे, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
मेयो रुग्णालयात बहुतांश वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आवश्यकतेच्या तुलनेत कर्मचारी व नर्सेस कमी आहेत. त्यांच्या कामाचा भार डॉक्टरांवर पडत आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक वाॅर्डात कागदोपत्री कारवाई आणि सहकार्यासाठी दोन नर्सेस तसेच दोन कर्मचारी असावेत. पण वाॅर्डात एक कर्मचारी व एक नर्स असते. अशीच स्थिती ऑपरेशन थिएटरची आहे. अनेकदा कर्मचारी रुग्णांशी संबंधित कामासाठी जातात. तेव्हा रुग्णांना दुसऱ्या वाॅर्डात डॉक्टरांनाच न्यावे लागते. यामुळे अन्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. एका वाॅर्डात ३० ते ३५ रुग्ण असतात. एका नर्सला काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे दोन नर्सची आवश्यकता असते. एक नर्स कागदपत्रांचे काम तर दुसरी वाॅर्डातील काम पाहील. याचप्रमाणे ऑपरेशन थिएटरमध्ये एक बाहेर तर एक आत अशा दोन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. या ठिकाणीही एकच कर्मचारी असतो. या कारणामुळे अनेकदा डॉक्टरांना ऑपरेशन थिएटरपासून वॉर्डापर्यंत ट्रॉली ओढून रुग्णाला न्यावे लागते. यासंदर्भात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर सरकारचे लक्ष वेधले आहे.
गेल्या काही दिवसापासून स्वच्छता नाही
रुग्णालयात अनेक दिवसापासून नियमित स्वच्छता झालेली नाही. परिसरात जागोजागी बायोवेस्ट कचरा पडला आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कॉरिडोरमध्ये एकच कर्मचारी असल्यामुळे कामावर परिणाम झाला आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सर्जिकल इमारतीपर्यंत स्थिती खराब झाल्याचे दिसून येत आहे.
संचालकांसमोर मांडला मुद्दा
कर्मचारी व नर्सेची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचार सेवांवर परिणाम होत आहे. हा मुद्दा आरोग्य संचालकांसमोर मांडला आहे. मनुष्यबळ वाढविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
- डॉ. भावना सोनवणे, अधिष्ठाता आयजीजीएमसी.