लाच प्रकरण : आज न्यायालयात हजर करणार नागपूर : लाचप्रकरणी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता आरोपी डॉ. मीनाक्षी इंदूप्रकाश गजभिये (वाहणे) या बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना गुरुवारी विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज त्यांच्या वकिलांनी मागे घेतला. याच प्रकरणातील अन्य दुसरा आरोपी मेयो कॅन्टीनचा मेसचालक विजय उदितनारायण मिश्रा याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. औषध पुरवठादार टिमकी गोळीबार चौक येथील आशिष मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्सचे मालक आशिष भय्याजी कळंबे यांनी मेयो इस्पितळाला केलेल्या औषध पुरवठ्याच्या २ लाख ९४ हजार ६६० रुपयांच्या देयकाच्या मंजुरीसाठी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच त्यांनी १६ जानेवारी रोजी विजय मिश्रा याच्यामार्फत स्वीकारली होती. एसीबीच्या पथकाने त्याच वेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. सापळ्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत रात्र झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अटक न करता १७ जानेवारी रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर होण्याबाबत सूचनापत्र देण्यात आले होते. परंतु गजभिये यांनी या कार्यालयात हजर होण्याचे टाळून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गजभिये यांना अटक करण्यासाठी एसीबीची वेगवेगळी पथके त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात, माहेरी आणि सासरच्या घरी रवाना करण्यात आली होती. परंतु त्या कोठेही आढळून आल्या नव्हत्या. बुधवारीही शोधमोहीम सुरूच असताना त्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास एसीबीच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना रीतसर अटक करण्यात आली. मंगळवारी विजय मिश्रा याला अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करून एसीबीने त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. या आरोपीचे वकील अॅड. दीपक दीक्षित, अॅड. विलास सेलोकर आणि अॅड. मिलिंद गाडगे यांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यावर २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे उपस्थित होते. तपास अधिकारी उपअधीक्षक दिनकर ठोसरे हे आहेत.(प्रतिनिधी)
मेयो अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये एसीबीला शरण
By admin | Published: January 19, 2017 2:30 AM