लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मेयो प्रशासन ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’सारखे नवे विभाग निर्माण करीत आहे. खाटांची संख्या ५९० वरून ८३३वर गेली आहे. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची पदे निर्माण करण्यात आली नाहीत. सध्या रुग्णालयात परिचारिकांची ४७५ पदे मंजूर असून ३१५ पदे भरण्यात आली आहेत. तब्बल १५७ जागा रिक्त आहेत. यातही साधारण ३० टक्के परिचारिका सुट्यांवर राहत असल्याने एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे.परिचारिका आरोग्य सेवेचा कणा आहे. विशेषत: रु ग्ण, रु ग्णांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांच्यातील परिचारिका हा एक मोठा दुवा आहे. रुग्णाला औषधे देण्यासोबतच आपुलकीचे नाते परिचारिकेमुळे जुळून राहते. रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालते. परंतु शासनाचे या परिचारिकांकडेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. मेयोमध्ये पूर्वी खाटांची संख्या ५९० व परिचारिकांची संख्या ४७५ एवढी होती. यामुळे रुग्णसेवेचा फारसा ताण नव्हता. परंतु गेल्या चार वर्षांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या १५००वरून अडीच ते तीन हजारावर गेली आहे. यातच एप्रिल २०१७ पासून ‘सर्जिकल्स कॉम्प्लेक्स’ रुग्णसेवेत रुजू झाले. मेयोच्या जुन्या ५९० खाटांमध्ये वाढीव २५० खाटांची भर पडली. अस्थिरोग, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध करून देण्यात आले. वाढीव खाटांमुळे जमिनीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना खाट मिळाली.मात्र, जुन्या खाटांच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची ७३ पदे, चतुर्थ कर्मचाऱ्यांची २०० पदे, फार्मसिस्टची सहा पदे , तंत्रज्ञाची पाच पदे याशिवाय इतरही रिक्त पदांकडे दुर्लक्ष झाले. या जागा न भरताच नव्याने २५० नव्या खाटांचा भार पडल्याने सर्वांवरच कामाचा ताण पडला आहे. याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) दिली. नव्या खाटांना मंजुरी देऊन त्या दृष्टीने वाढीव पदांची मागणी केली. परंतु ‘डीएमईआर’कडून याबाबत अद्यापही उत्तर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. कामाच्या ताणामुळे परिचारिकांचे सुट्यांवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना अटेन्डंटसह अनेकवेळा परिचारिकेचेही काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. परिचारिकांना तीन पाळीत काम करणे, त्यातही सुमारे ३० टक्के परिचारिका सुट्यांवर राहत असल्याने तीस ते चाळीस खाटांच्या वॉर्डात एक परीचारीका रुग्णसेवा देत आहे.
मेयो इस्पितळ : ४० रुग्णांमागे १ परिचारिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:53 PM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे.
ठळक मुद्देखाटा ८३३, परिचारिका ३१५ : १५७ पदे रिक्त