नागपूर : मेयोमध्ये आधीच बेडच्या तुलनेत परिचारिकांची संख्या तोकडी असताना पदव्युत्तर जागा वाढविण्याच्या उद्देशाने तपासणीसाठी येणाऱ्या ‘एनएमसी’च्या चमूला पायाभूत सोयी दाखविण्यासाठी रातोरात ३५ बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला. या विरोधात मंगळवारी परिचारिका दिवसभर संपावर गेल्या. बेडनुसार परिचारिकांची संख्या वाढविण्याची त्यांची मागणी आहे.
मेयोमध्ये ८४६ बेड असताना परिचारिकांची संख्या केवळ २८१ आहे. एका परिचारिकावर ४०च्यावर रुग्णांची जबाबदारी आली आहे. यासंदर्भात वारंवार प्रस्ताव पाठवूनही सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. याची खदखद परिचारिकांच्या मनात असताना मंगळवारी मेयोतील विविध विभागाच्या ‘पदव्युत्तर’ (पीजी) विद्यार्थ्यांचा जागा वाढविण्यासाठी ‘नॅशनल मेडिकल कमिशन’चे (एनएमसी) पथक आले होते. पायाभूत सोयी दाखविण्यासाठी मेयो प्रशासनाने सोमवारच्या रात्री ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’मध्ये त्वचारोग विभागासाठी ३५ बेडचा वॉर्ड तयार केला. आधिच बेडच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी असताना आणखी एक वॉर्डची जबाबदारी परिचारिकांवर टाकत असल्याचे पाहत मंगळवारी सकाळपासून परिचारिकांनी याला विरोध करीत कामबंद आंदोलन केले. परिचारिका संघटनेच्या वतीने अधिष्ठाता डॉ. संजय बीजवे यांना मागण्यांचे निवेदन देऊन दुपारी ४ वाजता आंदोलन मागे घेतले. परंतु दिवसभर वॉर्डात परिचारिका नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. काही शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
- परिचारिकांची ११५ पदे रिक्त
मेयोमध्ये ५९४ बेड मंजूर आहेत. २०१७ मध्ये ‘सर्जिकल्स कॉम्प्लेक्स’ रुग्णसेवेत रूजू झाल्याने बेडची संख्या वाढून ८४६ झाली. परंतु जुन्या बेडच्या तुलनेत परिचारिकांच्या ३९६ पदांनाच मंजुरी प्राप्त आहे. यातही २८१ पदे भरली असून तब्बल ११५ पदे रिक्त आहेत. यामुळे कामाचा मोठा ताण वाढल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे.
- रुग्णालयाला कोंडीत पकडण्याचा प्रकार
बेडच्या तुलनेत परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले. त्याचा पाठपुरावाही केला जात असताना पीजीच्या वाढीव जागेसाठी ‘एनएमसी’चे पथक आले असताना त्याच दिवशी कामबंद आंदोलन करणे, हा रुग्णालयाला कोंडीत पकडण्याचा प्रकार आहे.
-डॉ. संजय बीजवे, अधिष्ठाता मेयो