नागपूर : कोरोनाबाधितांना सेवा देणाऱ्या इन्टर्न (आंतरवासिता) डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मुख्य मागणीला घेऊन मेयो, मेडिकलचे ३५० वर डॉक्टर्स मंगळवारपासून संपावर गेले. यामुळे कोविड रुग्णसेवा प्रभावित झाली. डॉक्टरांच्या एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदनही सादर केले.
मागीलवर्षी कोविड ड्युटीमध्ये मुंबई व पुण्याच्या इन्टर्नना ५० हजार रुपये मानधन मिळाले होते. मात्र, इतरांना यापासून वगळण्यात आले. हे मानधन राज्यातील सर्व इन्टर्न डॉक्टरांना देण्यात यावे, या मागणीसह ३०० रुपये प्रति दिवस जेवण, प्रवास व प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात यावा, कोविड ड्युटीनंतर क्वारंटाईन होण्याची सोय असावी, आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी, शासनाचे विमा कवच प्रदान करावे आदी मागण्यांसाठी डॉक्टरांनी संपाचे हे हत्यार उपसले आहे.
सकाळी १० च्या सुमारास मेडिकल अधिष्ठाता कार्यालयासमोर डॉक्टरांनी नारे देत, निदर्शने करीत लक्ष वेधले. मेडिकलचे इन्टर्न डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. शुभम नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिल्यावर त्यांनी सकारात्मकता दाखवली. बुधवारी लेखी आश्वासन मिळाल्यास संप मागे घेऊ, असेही डॉ. नागरे म्हणाले. परंतु कोरोनाबाधितांच्या सेवेत मेयो, मेडिकलमधील डॉक्टर्स कमी पडत असताना इन्टर्न डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर याचा परिणाम झाला.