सुमेध वाघमारे/ राजीव सिंग
नागपूर : शून्य ते एक महिन्याच्या बाळाच्या आजाराचे तातडीने निदान होऊन उपचाराखाली आणणे महत्त्वाचे असते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये येणाऱ्या या वयोगटातील चिमुकले इतर रुग्णालयातून गंभीर होऊनच येतात. यामुळे डॉक्टरांचे प्रयत्नही थिटे पडतात. मृत्यूचा वाढलेल्या आकड्याचे मात्र रुग्णालयावर खापर फोडले जाते. डिसेंबरमध्ये मेडिकलच्या बालरोग विभागात भरती झालेल्या ६७७ रुग्णांमधून ४८ बालकांचा तर मेयोमध्ये ३०८ रुग्णांमधून १८ बालकांचा असे एकूण ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) केवळ विदर्भातीलच नव्हे तर छत्तीसगड, तेलांगणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून रुग्ण येतात. यात बाल रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. या दोन्ही रुग्णालयात एक महिन्यांच्या बालकांपर्यंत ‘निओनेटल इन्टेन्सीव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू) तर त्यावरील बालकांसाठी ‘पेडियाट्रिक इन्टेन्सीव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) आहे. परंतु सरासरी ६० टक्के रुग्ण दुसºया रुग्णालयातून येत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. यात आजाराचे निदान न झालेले, वेळेत उपचार न मिळालेले तसेच गंभीर रुग्णांचा समावेश आहे. काही तर पैसे संपले म्हणून मेयो, मेडिकलचा रस्ता दाखविणारे रुग्णालये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गंभीर झालेले रुग्ण ‘रेफर’ होऊन मेडिकलमध्ये येतात. नवजात अर्भकांच्या आजाराचे तातडीने निदान होणे आवश्यक असते. परंतु, अशा रुग्णांमध्ये आधीच झालेल्या उपचारांत उशीर हे मृत्यूचे कारण ठरते. - डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल