नागपूर : बदलत्या वातावरणाच्या दुष्परिणाम शरीरावर पडतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतुमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व महापालिकेच्या आयसोलेशन इस्पितळातही ‘कोल्ड वॉर्ड’ म्हणजे शीत कक्ष सज्ज झाले आहे.
तापमानात प्रचंड वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४२ अंश सेल्सियसच्यावर तापमान गेले आहे. यावर्षी तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यानुसार उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ होणार असल्याने मेयो, मेडिकल व मनपाचा आरोग्य विभाग कामाला लागले आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी विशेष सोय म्हणून ‘कोल्ड वॉर्ड’ सुरू करण्याचे कार्य मागील आठवड्यापासूनच हाती घेण्यात आले होते. मेयो, मेडिकलमधील शित कक्षामध्ये प्रत्येकी १० बेडची सोय करण्यात आली आहे.
उष्माघाताची लक्षणे रखरखत्या उन्हात कठोर शारीरिक श्रम करण्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. याची लक्षणे अचानक किंवा हळहळूही समोर येऊ शकतात. यात खूप घाम येणे, चक्कर येणे, थकावट वाटणे, उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होणे, मासपेशी आकडणे, मळमळ वाटणे आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत.
कोणाला धोका होऊ शकतो?उष्माघाता कोणालाही होऊ शकतो. परंतु ४ वर्षांपेक्षा छोट्या मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना हा आजार धोकादायक ठरू शकतो. कारण छोट्या मुलांमध्ये शरीराचे तापमान सामान्य करण्याची क्षमता विकसीत झालेली नसते तर ज्येष्ठांमध्ये औषधे आणि विविध आजारांमुळे उष्णता सहन करण्याची आणि शरीराला त्यानुरुप तयार करण्याची प्रक्रिया कमजोर पडलेली असते.
हे कराउन्हाशी संबंधित आजारांना दूर ठेवण्यासाठी उन्हात जाणे टाळा. उन्हात जाणे गरजेचे असल्यास सैल कपडे, संपूर्ण डोके झाकेल अशी टोपी किंवा छत्री, डोळ्यांसाठी गॉगल्सचा वापर करा. सनस्क्रीन लावून सनबर्नची जोखीम कमी करा. द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा. चांगल्या पद्धतीने ‘हाइड्रेटेड’ राहिल्याने शरीरातून घाम येणे आणि शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. उन्हात असलेल्या वाहनामध्ये कुणाला ठेवू नका. उन्हामध्ये व्यायाम करू नका.
‘शीत कक्ष’ रुग्णसेवेत उन्ह वाढू लागताच मेडिकलमध्ये ‘शीत कक्ष’ सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे १० बेडची सोय असलीतरी तुर्तास एकही रुग्ण भरती झालेला नाही. कक्षात आवश्यक औषधींसह आईस पॅक, स्प्रिंकलर, कुलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. -डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल