लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हाफकिन महामंडळाने मेयो, मेडिकलला दिलेल्या सलाईनचा मोठा साठा कोरोनाचा रुग्णांमुळे काही महिन्यातच संपला. सध्या एक ते दीड महिना पुरेल एवढाच साठा असल्याची माहिती आहे. शिवाय, इतरही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आहे. सिरिंज, ग्लोव्हजही रुग्णांना बाहेरून विकत आणण्यास सांगितले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
औषधे व यंत्रसामुग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक मेडिकलला औषधे व साहित्य खरेदीची जबाबदारी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ला देण्यात आली. मेयो, मेडिकलला औषधांसाठी मिळणारे सुमारे पाच ते सहा कोटींमधील ९० टक्के रक्कम हाफकिनकडे वळती करावी लागते. या निधीतून प्रस्तावानुसार औषधांचा पुरवठा होतो. त्यानुसार या दोन्ही रुग्णालयाला कोरोनाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात सलाईनचा पुरवठा झाला. मेडिकलमध्ये तर सलाईन ठेवण्यासाठी जागा अपुरी पडली. परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढताच सलाईनचा मोठा वापर झाला. वर्षभराचा साठा डिसेंबर महिन्यातच संपल्याने दोन्ही रुग्णालय अडचणीत आले आहेत. या रुग्णालयांकडून स्थानिक पातळीवर औषधी खरेदी केली जात आहे. परंतु यासाठी १० टक्केच रकमेचा वापर करण्याचा नियम आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा
मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना देण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पडला आहे. सूत्रानुसार, या दोन्ही रुग्णालय प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनसोबतच सलाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. परंतु त्यांनी सिव्हिल सर्जनकडून मागणी करण्यास सांगितले आहे. यामुळे औषधांच्या तुटवड्याची टांगती तलवार कायम आहे.
वितरकांनी औषध वितरण थांबविले
कोट्यवधी प्रलंबित देयके मंजूर करण्याबाबत राज्य सरकारच्या खरेदी व विक्री कक्षाकडून ठोस भूमिका घेण्यात आली नाही. यामुळे राज्यातील १०० पेक्षा अधिक औषध वितरकांनी औषध वितरण थांबविले आहे. तसेच नवीन टेंडर प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हाफकिनकडून येणारी औषधीही थांबल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.