लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी मेयो, मेडिकलमधील कोविड बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची संख्या स्थिर आहे. विशेष म्हणजे, १९ नोव्हेंबर रोजी दोन्ही रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली होती, परंतु आता कमी झाली आहे. खबरदारी म्हणून दोन्ही रुग्णालयात आवश्यक खाटा, ऑक्सिजन व औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी यांनी याचा आढावा घेतला.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दिसून आला. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा वेग कमी झाला. नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट आली. १ ते १० नोव्हेंबरदरम्यान मेयोच्या कोविड ओपीडीमध्ये ३० ते ५० रुग्णांची नोंद होती. परंतु ११ ते २० नोव्हेंबरदरम्यान रुग्णांची संख्या वाढून ५० ते ६० वर गेली. १९ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ६३ रुग्णांची नोंद झाली. परंतु मागील दोन दिवसापासून ही संख्या ४० ते ५० च्या दरम्यान स्थिरावली आहे. मेडिकलच्या कोविड ओपीडीत अशीच स्थिती आहे. १ ते १० नोव्हेंबरदरम्यान रोज २० ते ३० रुग्णांची नोंद व्हायची. परंतु ११ ते २० नोव्हेंबरदरम्यान २५ ते ३५ रुग्ण दिसून येऊ लागले. मागील दोन दिवसापासून रुग्णसंख्या १५ वर स्थिर आहे.
- तीन दिवसात अपघातात पाच मृत्यू
मागील चार दिवसापासून रोजच्या मृत्यूची संख्या १० च्या खाली आहे. परंतु अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये २१ व २२ नोव्हेंबर रोजी रस्ता अपघातात जखमी झालेल्या प्रत्येकी दोन रुग्णाचा तर, २३ नोव्हेंबर रोजी इमारतीवरून खाली पडून जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला.
कोविड ओपीडी स्थिती :मेयो, मेडिकल
तारीख रुग्ण
१५ नोव्हें. २३ ५१
१६ नोव्हें. २० ४७
१७ नोव्हें. ३० ४४
१८ नोव्हें. ३१ ५२
१९ नोव्हें. ३५ ६३
२० नोव्हें. २७ ५२
२१ नोव्हें. १७ ५६
२२ नोव्हें. १६ ३९