नागपूर : रुग्णांच्या तुलनेत बेडची संख्या कमी पडत असल्याने मेयोने २५० तर, मेडिकलने ५०० असे एकूण ७५० बेड वाढविले. मात्र, पाच वर्षे होऊनही शासनाने या वाढीव बेडला मंजुरीच दिली नाही. बेड आहे पण मनुष्यबळच नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनाच ‘अटेन्डंट’ची कामे करावी लागत असल्याचे या दोन्ही रुग्णालयातील विदारक चित्र आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ एप्रिल २०१७ मध्ये रुग्णसेवेत रुजू झाले. मेयोच्या जुन्या ५९० बेडमध्ये या कॉम्प्लेक्समुळे २५० बेडची भर पडली. अस्थिव्यंगोपचार, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध झाले. मात्र, जुन्या बेडच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची सुमारे ११५ पदे, चतुर्थ कर्मचाऱ्यांची २०० पदे, फार्मासिस्टची सहा पदे, तंत्रज्ञाची पाच पदे यांशिवाय इतरही पदे रिक्त असताना या नव्या बेडवरील कामाचा ताण सर्वांवर पडला आहे, याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) वेळोवेळी दिली. वाढीव पदांची मागणी केली; परंतु अद्यापही परवानगी मिळाली नाही. कर्मचाऱ्यांमध्ये कामाच्या ताण वाढल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.
-८३३ खाटा परिचारिका केवळ ४७५
मेयो रुग्णालयामध्ये जुने व नवीन बेड मिळून ८३३ बेड आहेत; परंतु त्या तुलनेत परिचारिकांची संख्या केवळ ४७५ आहे. यातील साधारण १० ते १५ टक्के सुटीवर राहत असल्याने तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे. वाजवीपेक्षा कामाचा ताण वाढल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. हीच स्थिती कर्मचाऱ्यांची आहे.
- मेडिकलच्या १४०० खाटांनाच मंजुरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) १४०० बेडना मंजुरी प्राप्त आहे; परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडिकलने बेडची संख्या वाढवून दोन हजार केली. असे असतानाही वैद्यकीय प्रशासनाने १९०० बेडच्या मंजुरीसाठी अर्ज केला; परंतु शासनाकडून अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही.