सुमेध वाघमारे
नागपूर : गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोत अपुऱ्या जागेमुळे रुग्णसेवेत अडथळे येत आहेत. ‘एनएमसी’नेही यावर ताशेरे ओढले आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात मेयोने ५०० खाटांचे ‘मेडिसीन युनिट’ची तयारी सुरू केली आहे. यासाठी लागणाऱ्या २६५ कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविला आहे.
१८६२ मध्ये ‘सीटी हॉस्पिटल’च्या नावाने सुरू झालेला धर्मादाय दवाखाना आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) विदर्भच नाही तर आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु, ३८.२६ एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयात शंभरी गाठलेल्या इमारती अडसर ठरू पाहत आहेत. यावर पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले. येथे शल्यचिकित्सा विभागापासून ते अस्थिरोग, नेत्ररोग व कान, नाक व घसा विभाग आल्याने शस्त्रक्रियांना वेग आला. परंतु औषधवैद्यकशास्त्र विभागापासून (मेडिसीन) इतर विभागाच्या अडचणी वाढल्या. जागा कमी पडत असल्याने रुग्णसेवा अडचणीत आली. शिवाय, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी) दरवर्षी या विभागातील युनिटची संख्या कमी असल्याचे सांगून त्रुटी काढीत आहे. यावर पर्याय म्हणून ‘मेयो’ने हे सर्व विभाग एकाच इमारतीत आणण्यासाठी ‘मेडिसीन युनिट’चा प्रस्ताव तयार केला आहे. ५०० खाटांच्या या इमारतीसाठी २६५ कोटींचा खर्च येणार आहे.
-मेडिसीन युनिटमध्ये या विभागांचा असणार समावेश
‘मेडिसीन युनिट’मध्ये कॅज्युअल्टी, औषधवैद्यकशास्त्र विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, त्वचारोग विभाग, श्वसन रोग विभाग, मानसिक रोग विभाग व रेडिओलॉजी विभाग आदींचा समावेश असणार आहे. तळमजल्यासह पाच मजल्याच्या इमारतीत हे सर्व विभाग असतील.
-अतिदक्षता विभागापासून, लेबर रुम असणार सज्ज
या ‘युनिट’मध्ये पाच अतिदक्षता विभाग (आयसीयू), दोन लेबर रुम व तीन शस्त्रक्रियागृह सज्ज असणार आहेत. यात मेडिसीन व बालरोग विभागाचे दोन तर स्त्रीरोग विभागाचे एक ‘आयसीयू’ असणार आहे. प्रत्येक विभागाचा ३० खाटांचे चार ते पाच वॉर्ड असणार आहे.
- मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता
५०० खाटांचा मेडिसीन युनिटचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (डीएमईआर) पाठविण्यात आला होता. त्यांनी काढलेल्या त्रुटींवर काम करीत त्या दूर करण्यात आल्या. यामुळे आता ‘डीएमईआर’कडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे गेला आहे. रुग्णांची गरज लक्षात घेता याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. भावना सोनवणे, अधिष्ठाता मेयो