लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून ३३ महिन्यांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूंची संख्या सरासरी १७० इतकी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘मेयो’ इस्पितळाच्या आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागात किती रुग्ण आले, यातील किती रुग्णांचा मृत्यू झाला, औषधांवर किती खर्च झाला, राजीव गांधी जीवनदायी योजनेत किती रुग्णांना लाभ झाला, या योजनेवर किती खर्च झाला व प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या किती तक्रारी आल्या, याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘मेयो’च्या बाह्यरुग्ण विभागात १८ लाख ८१ हजार ९९५ तर आंतररुग्ण विभागात १ लाख ३ हजार ९३० रुग्ण आले.यापैकी ५ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २ हजार १२ तर २०१७ मध्ये १ हजार ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर या वर्षात १ हजार ६२७ मृत्यूंची नोंद झाली.
जीवनदायीचे तीन हजारांहून अधिक लाभार्थी३३ महिन्यांच्या कालावधीत ‘मेयो’ इस्पितळात ३ हजार ५४ रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेतला. या योजनेतून प्राप्त झालेल्या रकमेतून १ कोटी ८२ लाख ७२ हजार २०८ रुपयांचा खर्च करण्यात आला. या कालावधीत रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्याविरुद्ध एकूण ९ तक्रारी प्राप्त झाल्या. २०१७ मध्ये सर्वाधिक ७ तक्रारी प्राप्त झाल्या.