लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आल्याने नेत्ररोग विभाग, अस्थिरोग, जनरल सर्जरी व ईएनटी विभागाचे शस्त्रक्रियागृह मागील पाच महिन्यापासून बंद आहेत. सध्या ६०० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये कोविडचे ५० रुग्ण नाहीत. यामुळे तळमजल्यावरील चार शस्त्रक्रियागृह सुरू करण्याचे मेयो प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
मेयोमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे ५०० खाटांच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. तीन वर्षांपूर्वी हे कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत सुरू झाले. या कॉम्प्लेक्समध्ये अस्थिरोग, जनरल सर्जरी, ईएनटी व नेत्ररोग विभागाचे वॉर्ड व शस्त्रक्रियागृह आहेत. परंतु जून महिन्यापासून कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होताच सर्जिकल कॉम्प्लेक्स बंद करून कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. यामुळे चारही विभागाच्या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या. गेल्या पाच महिन्यापासून मोजक्याच व किरकोळ स्वरूपाच्या शस्त्रक्रिया दुसऱ्या ठिकाणी होत आहेत. गंभीर रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. यामुळे मेयोचा भार मेडिकलला सहन करावा लागत आहे. सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये फार कमी रुग्ण आहेत. त्यामुळे तळमजल्यावरील चार शस्त्रक्रियागृह सुरू करण्यासाठी मेयो प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी एक समिती तयार करून त्यांचे एक पत्र लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. याला मंजुरी मिळताच अस्थिरोग, जनरल सर्जरी व ईएनटीच्या शस्त्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी दुजोरा दिला आहे.