लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा चव्हाट्यावर आली. याला गंभीरतेने घेत निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी तातडीने वाढीव ३६ सुरक्षा रक्षक व सहा महिन्यात पोलीस चौकी उभारण्याची ग्वाही दिल्याने गुरुवारी रात्री १० वाजता निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. शुक्रवारी या संदर्भातील लेखी आश्वासनही त्यांना मिळाले.मेयो रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात एकापेक्षा जास्त नातेवाईकांना आत जाण्यास प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने रोखल्याने बुधवारी वाद निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांवर हातही उगारला. काही वेळानंतर शंभरावर नातेवाईकांचा जमाव आला आणि सुरक्षा रक्षकांच्या अंगावर धावून गेले. मेयोचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. वाढीव सुरक्षा रक्षक व रुग्णालयाच्या परिसरात पोलीस चौकीची मुख्य मागणी लावून धरली. मात्र मेयो प्रशासनाकडून हवा तो प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहत सामूहिक सुटी असे नाव देत अडीचशेवर निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. गुरुवारी यातून तोडगा काढण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी प्रयत्न केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास संचालक डॉ. लहाने यांनी मोबाईलमधून मार्डच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मागण्या मान्य केल्या. शुक्रवारी तसे लेखी आश्वासन देत असल्याचे सांगितल्याने रात्री १० वाजता संप मागे घेण्यात आला. संप मिटल्याने मेयो प्रशासनासह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.असे मिळाले आश्वासन
- वाढीव ३६ सुरक्षा रक्षक
- सहा महिन्यात रुग्णालयाच्या परिसरात पोलीस चौकी
- २० दिवसांत रुग्णालात अलार्म सिस्टीम
- पासेस प्रणाली कठोरतेने राबविणार
- पार्किंगच्या सोयीकडे विशेष लक्ष देणार
- ओळखपत्राची तपासणी करणार
- प्रवेशद्वारावर रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी करणार
आश्वासन पाळले जाईल, हा विश्वास आहेवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मागण्या मान्य केल्या आहेत. तसे लेखी आश्वासनही दिले आहे. ते आश्वासन पाळतील हा विश्वास आहे. यामुळे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी डॉ. लहाने गंभीर आहेत.डॉ. विजय राठोडअध्यक्ष, मार्ड मेयो