सुमेध वाघमारे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयोच्या १५० एमबीबीएस जागांसाठी भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) काढलेली त्रुटी दूर न करता मेयो प्रशासनाने त्यात भर टाकली आहे. शल्यचिकित्सा विभागाचे एक युनिट कमी असल्याची त्रुटी असताना त्याच विभागाच्या वॉर्डात ‘एमआरआय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह इतरही त्रुट्या कायम असल्याने एमबीबीएसच्या वाढीव ५० जागा धोक्यात आल्या आहेत.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) नियंत्रण १९६७ सालापासून राज्य सरकारकडे आहे. या महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या ६० जागांवरून १०० जागा करण्याच्या तत्त्वानुसार ‘एमसीआय’ प्रशासकीय त्रुट्या काढत आली आहे. २००७ साली ‘एमसीआय’ने एक अहवाल सादर करून अनेकदा संधी देऊनही सुधारणांची अंमलबजावणी होत नसल्याने ४० जागा वाढविणे बंद करण्याची शिफारसही केली होती. त्यानंतर मधल्या काळात या मुद्द्यावर अनेक याचिका झाल्या. २०१४ मध्ये शासनाच्या नव्या धोरणानुसार मेयोच्या एमबीबीएसच्या ५० जागा वाढवून १०० वरून त्या १५० केल्या. यामुळे ४० जागांचा प्रश्न मागे पडला. परंतु वाढीव जागेनुसार नवी पदभरती झालीच नाही. यामुळे ५० जागांना घेऊन गोंधळ सुरूच आहे.प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात झालेल्या निरीक्षणात ‘एमसीआय’ने १३ त्रुट्या काढल्या. यातील बहुसंख्य त्रुट्या दूर करण्यास मेयो प्रशासनाला यशही आले. मात्र शल्यचिकित्सा, अस्थिरोग व फिजीओलॉजी विभागाची आणि लायब्ररीची त्रुटी अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे, १५० जागांसाठी पाच युनिटची गरज असते. परंतु सध्या चारच युनिट कार्यरत आहे. शल्यचिकित्सा विभागात एक युनिट कमी असल्याची त्रुटी ‘एमसीआय’ने काढली आहे. या युनिटसाठी सहयोगी प्राध्यापक, दोन लेक्चर्स व दोन वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदच कार्यान्वित करण्यात आले नाही. यामुळे ३० खाटांचा वॉर्ड नाही. ते दूर करण्यासाठी प्रयत्न होत असताना नुकतेच न्यायालयाने ‘एमआरआय’ सुरू करण्याबाबत ताशेरे ओढले. यामुळे हे यंत्र सर्जिकल कॉम्प्लेक्समधील शल्यचिकित्सा विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३२ मध्ये लावण्याचा निर्णय घेतला. तर हा वॉर्ड याच विभागाच्या ४२ क्रमांकाच्या वॉर्डात स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे शल्यचिकित्सा विभागाची त्रुटी कायम राहणार आहे. परिणामी, एमबीबीएसच्या ५० जागांवर संक्रांत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेयोच्या एमबीबीएसच्या ५० जागा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:42 AM
मेयोच्या १५० एमबीबीएस जागांसाठी भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) काढलेली त्रुटी दूर न करता मेयो प्रशासनाने त्यात भर टाकली आहे. शल्यचिकित्सा विभागाचे एक युनिट कमी असल्याची त्रुटी असताना त्याच विभागाच्या वॉर्डात ‘एमआरआय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह इतरही त्रुट्या कायम असल्याने एमबीबीएसच्या वाढीव ५० जागा धोक्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देसर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये ‘एमआरआय’चा निर्णय भोवणार!