मेयोच्या समस्यांना घेऊन अधिष्ठात्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:07 AM2018-06-27T00:07:50+5:302018-06-27T00:12:25+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सोई व आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या समस्येला घेऊन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने मध्य नागपूर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना घेराव घातला. सोबतच तातडीचे समस्या सोडविण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सोई व आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या समस्येला घेऊन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने मध्य नागपूर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना घेराव घातला. सोबतच तातडीचे समस्या सोडविण्याची मागणी केली.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने नुकतेच मेयोमध्ये ‘एमआरआय’व अद्ययावत ‘सिटी स्कॅन’ यंत्र नसल्याने एमबीबीएससह पदव्युत्तर जागा धोक्यात आल्याच्या व रुग्णांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत हा घेराव घालण्यात आला होता.
मेयोमधील गैरसोईंना घेऊन मध्य नागपूरचे महासचिव राजेश कुंभलकर व शहर उपाध्यक्ष रवी गाडगे पाटील यांनी समस्या मांडल्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष हाजी शेख हुसेन, नगरसेवक रमेश पुणेकर, माजी नगरसेवक रमण पवार, ब्लॉक अध्यक्ष महेश श्रीवास प्रामुख्याने उपस्थित होते. कुंभलकर यांनी रुग्णालयात तातडीने सिटी स्कॅन, एमआरआय, सिकलसेल रुग्णांसाठी गर्भजल परीक्षण यंत्र, रुग्णवाहिका व इतरही आवश्यक उपकरणे तातडीने उपलब्ध करून देण्याची व औषधांचा तुटवडा दूर करण्याची मागणी केली. शेख हुसेन यांनी ओपीडी व आयपीडीमध्ये २४ तास वरिष्ठ डॉक्टर तैनात राहत नसल्याची तक्रार केली. श्वान चावल्यानंतर रेबीज बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचण्याकरिता असलेली‘अॅण्टी रेबिज’ लस नसल्याकडे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी लक्ष वेधले. अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वसन दिले. शिष्टमंडळात शुभम लखोटिया, राजू असले, संजय पाटील , शालिकराम चरडे ,मनोज मालविया, बाबा राऊत,मोहम्मद शकील, रजनीश सूर्यवंशी, मोहम्मद कलीम, गजानन साबळे, देवेंद्र सूर्यवंशी, अब्दुल नाजू, बंटी साळुंखे ,अजय गावंडे आदींचा सहभाग होता.