सुमेध वाघमारेनागपूर : निवासी डॉक्टरांचा संपाचा दहाव्या दिवशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डॉक्टरांनी रस्त्यावर ‘ओपीडी’ थाटून रुग्ण तपासले. साधारण १५० वर रुग्णांना तपासण्यात आले. कोलकात्याचा निवासी डॉक्टर महिलेवर रुग्णालयाच्या आत अत्याचार करून हत्येची घटना घडल्याने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी चार भिंतींची गरज काय, असा प्रश्नही या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) व ‘मेयो’मधील जवळपास ८०० वर डॉक्टर संपात सहभागी आहेत. १३ ऑगस्टपासून संप सुरू असतानाही सरकारकडून अद्यापही तोडगा निघाला नाही. परिणामी, रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी, इन्टर्न व वरिष्ठ निवासी डॉक्टर ‘ओपीडी’, नियोजित शस्त्रक्रिया, वॉर्ड व नमुने तपासण्यांच्या कार्यात नसल्याने मोजक्याच डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णांची जबाबदारी आली आहे. परिणामी, उपचारात उशीर होत असल्याचे चित्र आहे. केवळ गंभीर रुग्णांनाच भरती करून घेतले जात आहे. किरकोळ शस्त्रक्रिया कमी झाल्या आहेत. अनेक रुग्णांना पदरमोड करून खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे. गुरुवारी ‘मेयो’च्या डॉक्टरांनी रस्त्यावर ‘ओपीडी’ लावून रुग्ण तपासल्याने आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
रस्त्यावर मेडिसीन ते पेडियाट्रिकची ओपीडी‘मेयो’चे ‘मार्ड’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. बालगंगाधर द्विडमुठे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. श्रेया गुप्ता, डॉ. पूजा सई, डॉ. नयन राजशेखर व डॉ. सामी यांच्या पुढाकारात रुग्णालयाच्या रस्त्यावर गुरुवारी ‘ओपीडी’ चालविण्यात आली. यात आंदोलनकर्ते डॉक्टरांनी मेडिसीन, पेडियाट्रिक, सर्जरी व ऑर्थाेपेडिकच्या रुग्णांची तपासणी केली. या अनोख्या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले.
ओपीडीत गर्दी, वॉर्ड अर्धे रिकामे‘मेयो’, ‘मेडिकल’मध्ये इतर दिवशी ओपीडीमध्ये दीड ते अडीच हजार रुग्ण उपचारासाठी येतात. संपाच्या काळात रुग्णांची ही गर्दी फारशी कमी झाली नाही. मात्र, वॉर्ड सांभाळणारे निवासी डॉक्टरच नसल्याने भरती रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वॉर्ड अर्धे रिकामे झाल्याचे दिसून येत आहे.