नागपूर : पेंच नदीच्या पात्रात असलेल्या घाेगरा देवस्थान परिसरात फिरायला आलेल्या सहा मित्रांपैकी एकाला नजीकच्या चिखली डाेहातील पाणी पाहून पाेहण्याचा माेह अनावर झाला. त्याने पाेहण्यासाठी डाेहात उडी मारली आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ते पाचही जण नागपूर शहरातील तिरपुडे महाविद्यालयाचे विद्यार्थी हाेत. ही घटना शनिवारी (दि. २५) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
शशांक उर्फ रॉबिन मनोज तिवारी (२३, बुटीबोरी, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे नाव आहे. ताे नागपूर शहरातील तिरपुडे महाविद्यालयात एमबीएच्या अंतिम वर्षाला शिकत हाेता. शशांक हा त्याच्या काॅलेजमधील बीसीसीएच्या पाच विद्यार्थ्यांसाेबत पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीत असलेल्या घाेगरा देवस्थान परिसरात फिरायला आला हाेता. ते पाचही जण त्याचे मित्र हाेते. काही वेळाने ते मंदिराच्या मागच्या भागाला असलेल्या चिखली डाेहाकडे गेले.
सर्व जण नदीकाठच्या झाडाखाली बसले. त्यातच डाेहात पाणी असल्याचे पाहून आपल्याला पाेहायचे आहे, असे म्हणत शशांकने पाण्यात उडी मारली. बराच वेळा हाेऊनही ताे पाण्याबाहेर न आल्याने मित्रांनी नागरिकांसह पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
अब तक ३२
पेंच नदीच्या पात्रातील हा डाेह आत कपारी असल्याने धाेकादायक आहे. त्यामुळे त्यात कुणीही आंघाेळ करण्यासाठी अथवा पाेहण्यासाठी उतरू नये, असे सूचना फलक लावले आहेत. मात्र, हाैशी तरुण त्याकडे दुर्लक्ष करीत पाेहायला उतरतात आणि जीव गमावतात. या डाेहात मागील आठ-दहा वर्षात ३२ पेक्षा अधिक लाेकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती येथील दुकानदारांनी दिली असून, त्याला पाेलीस व देमा खंडाते यांनी दुजाेरा दिला आहे.
देमांचे निस्पृह कार्य
मृत शशांक तिवारी हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा हाेता. त्याचा मृतदेह देमा खंडाते (६७, रा. पारशिवनी) यांनी पाण्यात शाेधून बाहेर काढला. त्यांनी अलीकडच्या काळात २२ मृतदेह बाहेर काढले आहेत. या कार्यासाठी ते कुणाकडेही पैसे मागत नाहीत. कुणी स्वखुशीने पैसे दिले तरच स्वीकारतात. देमा घटनास्थळी येण्यापूर्वी दाेघांनी दाेन तास शशांकचा पाण्यात शाेध घेतला हाेता. मात्र, त्यांना यश आले नाही. देमा यांनी अवघ्या २० मिनिटात शशांकचा मृतदेह बाहेर काढला.