नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एमबीबीएस अंतिम वर्षाचा एका विद्यार्थ्यांने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्यासुमारास आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. परीक्षेच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
पवन काकडे (२३) रा. वाशिम असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस अंतिम वर्षाचा तो विद्यार्थी होता. मागील काही दिवसांपासून कॉलेजकडून एमबीबीएस अंतिम वर्षाचा परीक्षेची तयारी करवून घेतली जात आहे. त्यानुसार सोमवारी बालरोग विभागाचा पेपर होता. मागील काही दिवसांपासून पवन तणावात होता. एकटा-एकटा रहायचा. शनिवारी तो कु णाला न सांगता मेडिकलच्या वसतिगृहातून बाहेर पडला. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची माहिती इतर विद्यार्थी व शिक्षकांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला. रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह मेडिकलच्या आकस्मिक विभागात आणला असता विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
- विद्यार्थ्यांची मेंटल हेल्थ तपासणी गरजेचीनिवासी डॉक्टरांची संघटना ‘सेंट्रल मार्ड’चे मार्गदर्शक डॉ. सजल बंसल म्हणाले, निवासी डॉक्टांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणारे नैराश्य याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशीकने दर वर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत. मात्र, बहुसंख्य कॉलेजेस्चे याकडे दुर्लक्ष झाले असते. याच धर्तीवर एमबीबीएस विद्यार्थ्यांचीही तपासणी होणे व त्याला सर्व कॉलेजेसने गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. असे झाल्यास अश्या भावी डॉक्टरांच्या आत्महत्या थांबविणे शक्य आहे.