लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोशन शेख टोळीतील गुन्हेगार आणि मकोकाचे आरोपी अंकित पाली तसेच अभिषेक सिंग या दोघांना गुन्हे शाखेने फरार घोषित केले आहे.
खंडणी वसुली, महिलांचे लैंगिक शोषण, जबरदस्तीने फ्लॅट, प्लॉटवर कब्जा करण्याच्या आरोपात गुन्हेशाखेने कुख्यात रोशन शेख आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध मकोका लावला होता. धरमपेठेतील मोक्याच्या ठिकाणच्या सदनिकेवर कब्जा करून २ मे २०१९ ला गौरव दाणी यांना मारहाण करून त्यांच्यासह छोट्या मुलाचे अपहरण करणे, खंडणी वसुली करणे आणि रक्कम लुटण्याच्या आरोपाखाली रोशन, अंकित आणि अभिषेकविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर या टोळीविरुद्ध नागपूरसोबत मुंबई आणि अन्य ठिकाणांहून बलात्कार तसेच अन्य गंभीर तक्रारी आल्यानंतर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलिसांनी या टोळीवर मकोका लावला होता. त्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी पोलीस कामी लागले. तेव्हापासून अंकित आणि अभिषेक फरार झाले. या दोघांना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत हजर होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, ते हजर न झाल्यामुळे अखेर या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी एक प्रसिद्धिपत्रक काढून फरार घोषित केले.
माहिती देण्याचे आवाहन
मकोका प्रकरणाचे दोेषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची तयारी गुन्हे शाखेने चालवली आहे. त्यामुळे फरार घोषित करण्यासोबत अंकित आणि अभिषेकबद्दल कुणाला माहिती असल्यास गुन्हे शाखेला कळवावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांनी केले आहे.