लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम नागपूरच्या कुख्यात शेखु खान टोळीविरुद्ध पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. आंबेकरनंतर मकोका लावलेली ही दुसरी टोळी आहे.शेखुच्या साथीदारात शिवा बेजंकीवार, सूरज चौधरी, अथर्व खडाखडी, परवेश गुप्ता, अजय ऊर्फ चिडी मेश्राम आणि आकाश चव्हाण यांचा समावेश आहे. शेखु टोळी मागील अनेक दिवसांपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली होती. प्रेयसी आणि साथीदार पकडल्या गेल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. १० ऑक्टोबरला तो चार साथीदारांसोबत पकडल्या गेला. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. शेखु टोळीने २६ ऑगस्टला रात्री दारू विक्रेता मनिषनगर येथील रहिवासी प्रशांत ऊर्फ बंडु आंबटकरचे अपहरण केले होते. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात नेले. तेथे हवेत गोळी झाडुन खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास खुनाची धमकी दिली होती. शेखुच्या सांगण्यानुसार बंडूने पत्नीला फोन करून पैसे पाठविण्यास सांगितले. पत्नीने बंडूला पैसे घेण्यासाठी घरी येण्यास सांगितले. त्यानंतर शेखु साथीदारांसह बंडूच्या घरी १० लाख रुपये घेण्यासाठी आला होता. बंडूने गुन्हे शाखेत याची तक्रार दिली होती. त्यानंतर शेखु टोळीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. शेखु साथीदारांसह फरार होता. ४ ऑक्टोबरला सकाळी मनिषनगरच्या जयदुर्गा सोसायटीत धाड टाकून त्याची प्रेयसी स्नेहल सुधीर पीटर आणि साथीदार शिवा ऊर्फ शिवप्रसाद बेजंकीवार तसेच आकाश चव्हाणला पकडले होते. शेखुवर खून, फायरींगसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो युवतींवर लाखो रुपये उडवित होता. पोलिसांपासून बचावासाठी त्याने विदेशी कुत्रे पाळले होते. त्याचा महिन्याचा खर्च एक लाखापेक्षा अधिक होता. त्याने गुन्हेगारीतून बरीच संपत्ती गोळा केली आहे. आंबेकरच्या धर्तीवर त्याच्यावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागपुरातील शेखु गँगवर मकोका : सहा साथीदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 12:21 AM
पश्चिम नागपूरच्या कुख्यात शेखु खान टोळीविरुद्ध पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. आंबेकरनंतर मकोका लावलेली ही दुसरी टोळी आहे.
ठळक मुद्देगुन्हेगारांमध्ये उडाली खळबळ