दीड कोटींचा भूखंड : बनावट कागदपत्रे तयार करून विकला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून त्याची दीड कोटी रुपयात विक्री करणारा आरोपी बिल्डर छगन ऊर्फ छगनलाल कुंवरजीभाई पटेल (वय ५७) याची आज न्यायालयीन कस्टडीत रवानगी झाली आहे. त्याचा साथीदार सौरभ जुगलकिशोर अग्रवाल तूर्त फरार आहे. अंबाझरीतील रहिवासी डॉ. राजश्री रामलाल चौधरी यांच्या वडिलांशी आरोपी छगन पटेलचे घरगुती संबंध होते. त्याचा गैरफायदा घेत आरोपी पटेलने मौजा नागपूर येथील सर्वे क्र. ३१९/ १ ते ३१९/४ आणि ३२० सिटी सर्वे क्र. १०१ सिट नंबर २४८ मधील ३८ क्रमांकाच्या भूखंडाचे बनावट आममुख्त्यारपत्र तयार केले. त्याआधारे सौरभ जुगलकिशोर अग्रवाल याला हा भूखंड १ कोटी ४५ लाख रुपयात विकल्याचे ६ एप्रिल २०१७ ला विक्रीपत्र केले आणि १० एप्रिल ते ५ मे या कालावधीत हा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच डॉ. चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, त्यावेळी पोलिसांनी टोलवाटोलवी केली. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे येताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी विशेष पथकातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घेतली. छगन पटेल याच्याकडे या मालमत्तेविषयीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना त्याने गुन्हेगारी कटकारस्थान करून ही फसवणूक केल्याचे उघड झाल्याने पटेल आणि अग्रवालविरुद्ध गुरुवारी सायंकाळी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर छगन पटेलला पोलिसांनी अटक केली. दुसरा आरोपी सौरभ जुगलकिशोर अग्रवाल याचीही पोलीस शोधाशोध करीत आहेत. तो तूर्त गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला अटक झालेली नाही. पोलिसांवर दडपण आरोपी छगन पटेलचे सीताबर्डीत जीजीओ रियल इस्टेट नावाने कार्यालय आहे. त्याचे अनेक बिल्डर आणि लॅण्ड डेव्हलपर्ससोबत संबंध आहेत. पटेलला गुन्हे शाखा पोलीस अटक करणार असल्याची वार्ता कळताच त्याच्या साथीदारांनी वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, पोलिसांनी हे दडपण झुगारून त्याला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करून पीसीआरची मागणी करण्यात आली. मात्र, कोर्टाने पीसीआरऐवजी पटेलला एमसीआर मंजूर केला.
बिल्डर छगन पटेलला एमसीआर
By admin | Published: May 27, 2017 2:38 AM