जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हाईट कॉलर लोकांमध्ये वाढलेली नशाखोरी आणि या व्यावसायिकांचे मजबूत नेटवर्क यामुळे ड्रग्स माफियांनी उपराजधानीत आपले भक्कम पाय रोवले आहेत. त्यांचा काळाबाजार दिवसेंदिवस वाढत असून कोरोना संक्रमणाच्या काळातही त्यावर फारसा परिणाम पडलेला नाही. मागील १६ महिन्यांच्या काळात तीन कोटी रुपयांचा गांजा आणि एमडी या व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आला. यावरून हा व्यवसाय किती फोफावला असावा, याचा अंदाज येतो.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ड्रग्स फ्री सिटी’ संकल्पनेअंतर्गत १० नोव्हेंबरला एमडी तस्करांविरोधात विशेष अभियान राबविले होते. यात शहरातील २३ सक्रिय गुन्हेगारांवर धाडी घातल्या होत्या. स्थानिक पोलिसांना या मोहिमेत सहभागी केल्याने अनेक गुन्हेगारांना या मोहिमेची माहिती मिळाली होती. पोलिसांना एका आरोपीकडून गांजा तर दुसऱ्याकडून एमडी मिळत होती. मात्र ही उपलब्धी सागरातील थेंबासारखी ठरली. यावरून ड्रग्ज माफियांना किती खोलवर पाय रोवले असावेत, याची कल्पना पोलिसांना आली. अन्य मादक पदार्थांच्या तुलनेत एमडीची नशा महाग असते. यामुळे बहुतेक शौकिन संपन्न आणि सुखवस्तू घरातील असतात. यात सट्टेबाज, बिल्डर, व्यावसायिक गुन्हेगार तसेच व्हाईट कॉलर माणसे सहभागी असतात. यामुळेच लॉकडाऊनच्या काळातही एमडी मोठ्या प्रमाणात शहरात पोहोचत राहिली. क्राइम ब्राँचच्या एनडीपीए सेलने २०२०च्या जानेवारी ते डिसेंबर या काळात १ कोटी ६४ लाख रुपयांचा गांजा आणि एमडी पकडली. २०२१च्या प्रारंभातील चार महिन्यांच्या काळात १ कोटी ३५ लाख रुपयांची एमडी आणि गांजा पकडला. मागील चार महिन्यात कोरोना संक्रमणाच्या काळात लोकांची आर्थिक स्थिती बिकट असतानाही हा व्यवसाय मात्र जोरात होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाच्या काळात कंगाल झालेल्या अनेक गुन्हेगारांनी नशेसाठी औषधांचा वापर केला. या प्रकरणी पाचपावली येथील व्यापाऱ्याला अटक केल्याचे प्रकरण ताजेच आहे. शहरातील अनेक औषध विक्रेो यात गुंतले आहेत. गुन्हेगारांकडून एमडी, गांजाची मागणी घटली तरी व्हाईट कॉलर गुन्हेगारांकडून मागणी वाढली आहे. पाहिजे तेवढी किंमत ते यासाठी मोजत आहेत. लॉकडाऊनमध्येही शहरातील काही निवडक ठिकाणांसह रिसॉर्ट, फार्म हाऊस, हॉटेलमध्ये त्यांच्या विक एंड पार्ट्या रंगत आहेत. यात ड्रग्स, हुक्का आणि नाचगाणे असते. नाकाबंदी असली तरी हा प्रकार थांबलेला नाही.