लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर पोलिसांनी रविवारी रात्री व्हीसीएच्या मैदानाजवळ मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजाराचे एमडी पावडर जप्त केले. मोहम्मद शाहनवाज ऊर्फ शानू मोहम्मद आरिफ (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो हसनबागमध्ये राहतो.शानू कार चालक म्हणुन काम करतो. त्याला स्वत:लाही एमडीचे व्यसन जडले आहे. त्यामुळे शानू या गोरखधंद्यात ओढला गेल्याचे समजते. त्याचे ताजाबाद परिसरातील अमली पदार्थांच्या तस्करांसोबत संबंध असल्याचे सांगितले जाते. तेथून तो एमडीसारख्या महागड्या अमली पदार्थांची खेप घेऊन जागोजागी पुरवितो. रविवारी रात्री सदर पोलिसांचे गस्ती पथक व्हीसीए परिसरात गुन्हेगारांची शोधाशोध करीत होते. त्यांना बिशप कॉटन स्कूलच्या मैदानाजवळ शानू दुचाकीवर संशयास्पद अवस्थेत दिसला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत लपवून ठेवलेले ३.३० ग्राम एमडी पावडर सापडले. बाजारात त्याची किंमत ९ हजार ९०० रुपये आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपल्याला एमडीची लत असून ती पूर्ण करण्यासाठी (स्वत:साठी) एमडी पावडर आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, ही माहिती देऊन तो दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांचे मत आहे. एमडीच्या बड्या तस्करांना वाचविण्यासाठी शानूने एमडी कुणाकडून आणली, ते सांगण्यासाठी टाळाटाळ चालविली आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी त्याला न्यायालयात हजर करून, त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळविला. सदरचे ठाणेदार महेश बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, पंकज सयाम तसेच विजयेंद्र यादव, रवींद्र लाड, राहुल बारापात्रे, सय्यद अली आणि प्रेम ढोके यांनी ही कामगिरी बजावली.पोलिसांचे जागोजागी छापेव्हीसीएजवळचा एक विशिष्ट परिसर अमली पदार्थ विकणाऱ्यांचे खास ठिकाण आहे. काही धनिकबाळ आणि कॉलेजिअन्सना ते तेथे बोलवून एमडीसारख्या महागड्या अमली पदार्थाची खेप देतात. सूत्रांच्या माहितीनुसार, शानूने एमडी तस्करीशी संबंधित असलेल्या दोघांची नावे सांगितल्याचे समजते. त्यानुसार, सदर पोलिसांच्या पथकांनी व्हीसीए, सदर तसेच सक्करदºयातील काही ठिकाणी छापे घातले. त्यांच्या हाती काय लागले, हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.
नागपुरात एमडीची तस्करी करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 9:16 PM
सदर पोलिसांनी रविवारी रात्री व्हीसीएच्या मैदानाजवळ मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजाराचे एमडी पावडर जप्त केले.
ठळक मुद्दे१० हजाराची एमडी जप्त : सदर पोलिसांची कारवाई