नागपूर : इराणमध्ये तुमच्या नावाचे एक पार्सल चालले असून त्यात १०० ग्रॅम एमडी आहे अशी बतावणी करत एका महिलेला जाळ्यात ओढण्यात आले. पोलिसांच्या बनावट नावाने वेबलिंक पाठवत तिच्या मोबाईलचा ॲक्सेस घेण्यात आला व परस्पर २० लाखांचे कर्ज घेत तिच्या खात्यातून ती रक्कम वळती करण्यात आली. नागपुरात ही घटना घडली असून पोलिसांकडून या नवीन फंड्यामुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे.कनक असे संबंधित महिलेचे नाव असून ती खाजगी नोकरी करते. ४ जुलै रोजी तिला ९८२३५३७१०२ या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने कनक यांचे आधार कार्ड तपशील सांगत त्यांच्या नावाने मुंबईवरून इराणला पार्सल जात असून त्यात १०० ग्रॅम एमडी सापडल्याचे सांगितले. समोरील व्यक्तीने तो फेडएक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले व फोन नार्कोटिक्स विभागात फॉरवर्ड करत असल्याची बतावणी केली. त्याने त्या विभागाकडून पोलीस क्लिअरींग प्रमाणपत्र घेण्यासदेखील सांगितले. घाबरलेल्या कनक यांनी आरोपीच्या सांगण्यावरून स्काईप हे ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर आरोपीने सायबर विभागाशी मिळतीजुळती असलेली एक वेबलिंक पाठविली. कनक यांनी जास्त विचार न करता त्यावर क्लिक करून तपशील भरले.
आरोपीच्या सांगण्यावरून त्यांनी स्काईपवरून मोबाईलची स्क्रीन आरोपीसोबत शेअर केली. त्यानंतर आरोपीने त्यांचा फोन होल्डवर ठेवला. काही वेळातच कनक यांच्या मोबाईलवर २० लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचा एसएमएस आला व त्यांच्या खात्यात १९.९२ लाख रुपये जमा झाल्याचा दुसरा एसएमएसदेखील आला. यामुळे कनक गोंधळल्या असतानाच काही वेळातच त्यांच्या खात्यातून दोनदा १० लाखांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाली. त्यानंतर स्काईप कॉल कट झाला. आपली फसवणूक झाल्याचे तेव्हा कनक यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.