लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक काळात माध्यमांनी कळस गाठला आहे. काय दाखवावे, काय दाखवू नये, याची आचारसंहिता नाही. बातमी मूल्य धाब्यावर बसवून पत्रकारिता सुरू आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. हे थांबविण्यासाठी या माध्यमांमुळे ग्रस्त झालेल्या माध्यमग्रस्तांचा दबावगट तयार होऊन तो कृतिशील व्हायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी तथा पत्रकार सुनील शिनखेडे यांनी आज येथे केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात आयोजित गणेश व्याख्यानमालेत ‘माध्यमांचे जग व माध्यमग्रस्तांचे जग’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग होते. शिनखेडे म्हणाले, माध्यमांचा रंजक प्रवास खूप काही शिकविणारा आहे. टीव्ही आल्यावर अनेक चांगले कार्यक्रम दाखविले जात. तेव्हाच्या मालिकांनी सांस्कृतिक, भावनिकदृष्ट्या देश जोडला. परंतु नंतर हे माध्यम बाजारपेठांनी काबीज केले. तेव्हापासून ते आज श्रीदेवीच्या मृत्यूपर्यंत माध्यम प्रगल्भ झाले का? हा प्रश्न आहे. टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअॅप अशा सर्वच माध्यमावर हा मॅसेज ११ जणांना पाठवा हा प्रकार घडला. हे माध्यमांना टाळता आले असते. इंग्लंडसह इतरही देशात हे घडले. परंतु तेथील माध्यमांच्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत. आपल्याकडे स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. माध्यमांचे विविध उत्पादनात शेअर्स असल्यामुळे जाहिरातींचा भडीमार होऊन चांगले कार्यक्रम देणे ही बाब दुय्यम ठरते. राज्यकर्त्यांच्या हातात माध्यमे असल्यामुळे माध्यमे कशी हाताळावी, हे त्यांना कोण शिकविणार? माध्यमे जे दाखवितात त्याची उपयुक्तता आहे का, याचा विचार होत नाही. आरुषी खून प्रकरणात समाजातन्यायालयासारखी यंत्रणा आहे, याचाही विसर माध्यमांना पडला. प्रेक्षक मालिका, बातम्यांशी समरस होतात, याची पर्वा माध्यमांना नाही. मालिकेतही पुढे काय होणार हे लेखक नाही तर माध्यम ज्यांच्या हाती आहे ते ठरवितात. आज आपल्यावर राज्यकर्ते नाही तर माध्यमं राज्य करीत आहेत. माध्यमांशी समरस होऊन अनेक मानसिक रुग्ण तयार झाले आहेत. हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोक्याचे आहे. मराठी चॅनलमध्ये हिंदी अँकर काम करीत असल्याने मराठीचे विद्रुपीकरण होत आहे. याला विरोध करण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी माध्यमांनी ग्रस्त झालेल्यांचा दबावगट तयार होणे गरजेचे असल्याचे शिनखेडे यांनी सांगितले. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..............
माध्यमांवर अंकुशासाठी हवा माध्यमग्रस्तांचा दबावगट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:56 AM
आधुनिक काळात माध्यमांनी कळस गाठला आहे. काय दाखवावे, काय दाखवू नये, याची आचारसंहिता नाही. बातमी मूल्य धाब्यावर बसवून पत्रकारिता सुरू आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. हे थांबविण्यासाठी या माध्यमांमुळे ग्रस्त झालेल्या माध्यमग्रस्तांचा दबावगट तयार होऊन तो कृतिशील व्हायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी तथा पत्रकार सुनील शिनखेडे यांनी आज येथे केले.
ठळक मुद्देसुनील शिनखेडे यांचे प्रतिपादन : ‘माध्यमांचे जग व माध्यमग्रस्तांचे जग’ यावर व्याख्यान