कृपाल तुमाने : महेश मोकलकर यांना कुशल संघटक पुरस्कार प्रदाननागपूर : प्रसार माध्यमे हा संविधानाचा चौथा स्तंभ आहे. मात्र आज पत्रकार कसे वागतात, हे विचार करायला लावणारे आहे. बदलत्या काळानुसार पत्रकारितेत व्यावसायिकता येणे चुकीचे नाही. मात्र त्याच वेळी समाजभानही जपणे गरजेचे आहे. समाजभान हरपले तर पत्रकारितेचे मूळ तत्त्व हरविले जाईल. पत्रकारितेसोबत राजकारण्यांची पत घसरत चालली आहे. या दोघांसोबत प्रशासकीय अधिकारीही दोषी आहेत, अशी टीका खासदार कृपाल तुमाने यांनी एका कार्यक्रमात केली.विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणारा स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार यावर्षी महेश मोकलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कृपाल तुमाने बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार दत्ता मेघे, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. कृपाल तुमाने पुढे म्हणाले, प्रकाश देशपांडे हे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आणि महत्त्वाचा स्तंभ आहे. माध्यमातून समाजाला समोर नेणाऱ्या, विकासाला गती देणाऱ्या बातम्या यायला हव्यात. मात्र सध्या प्रसार माध्यमे भरकटलेली दिसतात. पत्रकारितेतून विकासाला गती देण्याचे काम व्हावे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आज समाजाची घडी बिघडत चालली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी असते. मात्र अधिकारी जबाबदारीतून पळ काढत आहेत. आजचे प्रशासकीय अधिकारी नेहमी नकारात्मक विचार करतात. कुठलेही कारण नसताना फाईल अडवून ठेवतात. आज प्रशासकीय अधिकारी विकासाला अडसर ठरत असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. दत्ता मेघे यांनी यावेळी प्रकाश देशपांडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. देशपांडे हे कोणतेही काम सचोटीने आणि प्रामाणिकपणे करीत होते. त्यांचे लिखाण निर्भीड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी महेश मोकलकर यांनी मनोगत व्यक्त करीत पुरस्काराप्रति आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
माध्यमांनी व्यावसायिकतेसोबत समाजभान जपले पाहिजे
By admin | Published: March 28, 2017 2:05 AM