- विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद जयंती उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांनी शासन, प्रशासनाच्या तोकड्या व्यवस्थेवर केलेला प्रहार हा योग्य होता. त्यासोबतच माध्यमांनी या काळात आपल्या जबाबदारीचे योग्य निर्वहन केल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्रकुमार ठाकूर यांनी व्यक्त केली.
विश्व संवाद केंद्राच्या वतीने देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘वर्तमान स्थितीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर भाष्य केले.
कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेच्या वेळी शासन, प्रशासन आणि समाज गाफील राहिला आणि त्याचे भोग प्रत्येकाच्याच वाट्याला आले. या काळात व्यवस्थेच्या बाबतीत निर्माण झालेली तूट वेदनादायी ठरली. मात्र, जगाच्या तुलनेत आणि अतिशय प्रगत देशांचा विचार केल्यास, भारताने एकजुटीने या महामारीतही उत्तम कामगिरी बजावली. याच काळात अनेक भ्रामक वृत्तही मोठ्या प्रमाणात फोफावले. गंगा नदीच्या काठावर दफन केलेल्या प्रेतांचे चित्र रंगवण्यात आले. मात्र, असे चित्र २०१५, २०१७ या वर्षातही दिसून आले होते. त्यामुळे, त्याचे गालबोट व्यवस्थेवर लावून होणार नाही. त्यामागची वस्तुस्थिती दाखवणेही योग्य राहील. अर्धसत्य वृत्तांनी समाजात भ्रम व भयाची स्थिती उत्पन्न होते आणि अराजकतेला चालना मिळते. त्यामुळे, माध्यमांनी आपल्या पारंपरिक कर्तव्याची जाणीव ठेवून समाजाचे बलिकरण करणे अपेक्षित असल्याचे मत नरेंद्र ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. विज्ञानाची प्रगती आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमाने आपण अत्यंत कमी वेळेत लस निर्माण केली. हा एक इतिहास आहे. माध्यमांनी सकारात्मकता पसरवण्यासोबतच आपण कोण्या अजेंड्याला बळी तर पडत नाही ना, याची काळजी घेण्याचे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले.
-----------------
नारदाचे ८४ भक्तीसुत्र प्रत्येकासाठी
देवर्षी नारदाबाबत अनेक भ्रामक कल्पना पसरविण्यात आल्या आहेत. ते संदेशवाहक असण्यासोबतच विद्वानही होते आणि त्यांची ८४ भक्तीसुत्रे समाजघटकातील प्रत्येकासाठी प्रेरक असल्याचे मत नरेंद्रकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले.
.................