लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘ऑस्टिओपोरोसिस’चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ‘हिप फ्रॅक्चर’ केव्हाही होऊ शकते. ‘डेक्सा स्कॅन’ या चाचणीद्वारे हाताची दोन्ही मनगटे, कंबरेचे हाड, पाठीचा कणा या सांध्याच्या मजबुतीची माहिती करून घेता येते. हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ यंत्र मेडिकलच्या सेवेत २०१७ पासून रुजू झाले. परंतु औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन) व अस्थिव्यंगोपचार विभाग (ऑर्थाेपेडिक) सोडल्यास इतर विभागाला या यंत्राचे वावगे असल्याचे चित्र आहे. परिणामी, दीड कोटीच्या यंत्राला आवश्यकतेप्रमाणे रुग्ण मिळेनासे झाले आहे.
मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. रुग्णांच्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावेत म्हणून १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून मेडिकलच्या डॉक्टरांनी ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची मागणी केली. ‘डेक्सा स्कॅन’ म्हणजेच ‘ड्युअल एनर्जी एक्स-रे अॅब्लॉस्प्रिओमिटरी’. रुग्णाला होणारा हाडांचा त्रास व लक्षणे याचे निदान करण्यास हे यंत्र मदत करते. फेब्रुवारी २०१७ मध्ये मेडिकलमध्ये हे दीड कोटीचे यंत्र रुग्णसेवेत दाखल झाले. या अद्ययावत यंत्रामुळे‘ऑस्टिओ पॅनिया’, ‘ऑस्टिओपोरोसिस’ आणि रजोनिवृत्तीमुळे हाडांची घनता कमी होणाऱ्या रुग्णांचे निदान केले जाते. ‘डेक्सा स्कॅन’मुळे रुग्णाला पॅथालॉजिकल चाचण्या करण्याची गरज भासत नाही. शिवाय एक्स-रेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्गदेखील अत्यंत कमी स्वरूपात असतो. एका क्लिकवर हाडांची घनता मोजता येते. उपराजधानीत हे यंत्र मेडिकलसह आणखी दोन खासगी केंद्रात आहेत. खासगीच्या तुलनेत मेडिकलमध्ये माफक दरात उपलब्ध आहे. यामुळे या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होईल व रुग्णांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मेडिसीन व ऑर्थाेपेडिक विभाग सोडल्यास इतर विभागातून रुग्ण पाठविलेच जात नसल्याची माहिती आहे. यामुळे रोज चार-पाच रुग्णांचीच तपासणी होत आहे. विशेष म्हणजे, या यंत्राचा सर्वाधिक फायदा महिलांसाठी व्हायला हवा होता. परंतु स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभागासह इतरही विभागाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधीचे हे उपकरण बंद तर पडणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.