नागपूर : बलात्कार पीडित तरुणीचा गर्भपात करणे शक्य आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना दिले. तसेच, यासंदर्भातील अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत सादर करण्यास सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पीडित तरुणी १७ वर्षे वयाची असून तिच्या गर्भात १८ आठवड्याचे बाळ आहे. २०१५ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर मुलीच्या आईने मुख्य आरोपी अनिलकुमार श्रीवास्तव याच्यासोबत संबंध जोडले. दरम्यान, श्रीवास्तवने पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. सततचा शारीरिक-मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर मुलीने २५ जून २०२१ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून श्रीवास्तवसह तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ती गर्भवती असल्याचे आढळून आले. परिणामी, मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्तीच्या वतीने ॲड. आदिल मिर्झा व ॲड. जी. एस. चांडोक तर, सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.