लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) वसतिगृहासाठी खरेदी करण्यात आलेले फर्निचर काही महिन्यातच खराब झाले. काही विद्यार्थ्यांच्या मते, हे फर्निचर निकृष्ट दर्जाचे होते म्हणूनच लवकर तुटले. तर विद्यार्थी फर्निचर योग्य पद्धतीने वापरत नसल्याने ते तुटल्याचे मेडिकल प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.मेडिकलचे वसतिगृह क्रमांक तीन, चार व पाच हे मुलांचे वसतिगृह आहे. येथील फर्निचर खराब झाल्याने नवीन साहित्याची मागणी विद्यार्थ्यांची होती. त्यांच्या मागणीनुसार वसतिगृह क्रमांक चार व पाचसाठी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी १ लाख ३५ हजार रुपये खर्चून ५० खाटांची खरेदी करण्यात आली. परंतु काही महिन्यातच या खाटा खराब झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार अनेक खाटांचे पाय वाकले, काहींचे प्लायवूड निघाले. खाटामध्ये वापरण्यात आलेले लोखंड सहज हाताने वाकते. या खाटांवर झोपणे धोकादायक ठरत असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या फर्निचरची तक्रार अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे केली आहे. ते सोमवारी वसतिगृहाची पाहणी करून चौकशी करणार असल्याची माहिती आहे.वसतिगृहासाठी खरेदी करण्यात आलेल्या ८० खुर्च्याही निकृष्ट दर्जाच्या निघाल्या. पाच-सहा महिन्यातच खुर्च्याचे हात, पाय तुटले. साधारण ३० वर खुर्च्या खराब झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.वसतिगृहात मुलांच्या भोजनासाठी २५ सप्टेंबर २०१८ रोजी दोन लाख १६ हजार रुपये खर्चून १२ डायनिंग टेबलची खरेदी करण्यात आली. परंतु पाच महिन्यातच टेबलला जोडून बसण्याच्या टेबलचे लोखंड उखडले. या टेबलवर जेवणासाठी बसताच येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.३० ऑगस्ट २०१८ रोजी ५० स्टडी टेबल खरेदी करण्यात आले. परंतु टेबलचे प्लायवूड निघाल्याचे तर काहींचे ड्रॉवर खराब झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.वॉटर कुलरही बंदवसतिगृह क्रमांक तीन, चार व पाचमधील पहिल्या मजल्यावर वॉटर कुलर आहेत. यातील काही वॉटर कुलर बंद पडले आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात लेखी कळविले आहे. परंतु सहा दिवसांचा कालावधी होऊनही कुलर सुरू झाले नसल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.