लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जास्तीत जास्त कौशल्यप्राप्त डॉक्टर निर्माण होण्यासाठी आणि गरीब रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना होणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.‘असोसिएशन ऑफ मिनीमल एक्सेस सर्जन्स ऑफ इंडिया’च्या वतीने गुरुवारी सुरेश भट सभागृहात आयोजित ‘अॅमिस्कॉन २०१९’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, परिषदेचे संयोजक डॉ. प्रशांत रहाटे, संयोजन अध्यक्ष डॉ. दिलीप गोडे, अॅमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू उपस्थित होते.गडकरी म्हणाले, खासगी क्षेत्राला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढतील व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या रोजगारामध्येही वाढ होईल. भारतातील डॉक्टरांची ख्याती ही जगभर पसरली आहे. इंग्लंड तसेच अमेरिकेतसुद्धा त्यांना चांगली मागणी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते डॉ. आमटे यांना ‘अॅमासी’ ही फेलोशिप प्रदान करून सन्मानित करण्यात आले.डॉ. आमटे म्हणाले, भामरागड परिसरात प्रारंभीच्या काळात आमची झोपडी होती. झाडाखाली दवाखाना काढला, परंतु रुग्ण नव्हते. भाषा कळत नव्हती. त्या लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्नपूर्वक काम केले. कुणाच्या तरी आपण कामात येत आहोत, हे समाधान होते. पैशांपेक्षा कितीतरी पटीने ते मोठे आहे, असेही डॉ. आमटे म्हणाले.भारतीय शल्यचिकित्सकेची परंपरा ही पाच हजार वर्षे जुनी आहे. प्राचीन वैद्यकशास्त्राची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असल्याचे अॅमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू यांनी यावेळी सांगितले. या परिषदेत सर्जरीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबतच १५०० वर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय गरजेचे : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:24 AM
वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
ठळक मुद्देअॅमिसकॉन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन