लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे गंभीर रुग्ण ज्यांना ‘आयसीयू’ बेडची गरज असताना त्यांना सामान्य वॉर्डात, तर ओळखीच्या रुग्णांना ‘आयसीयू’मध्ये ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मेडिकलमध्ये सुरू आहे. परिणामी, वॉर्डात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात काही ‘कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर ’(सीएमओ) रुग्णांशी हा भेदभाव करीत असल्याचे समोर आले असून, याची तक्रार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यापर्यंत गेल्याची माहिती आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रकोप कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. रोज सहा ते सात हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अव्वाचे सव्वा बिल आकारले जात असल्याने गरीब व सामान्य रुग्णांना मेडिकलचा आधार आहे. परंतु येथील कोविड रुग्णालयात ‘सीएमओ’च्या उर्मट वागणुकीला रुग्णाला समोर जावे लागते. रुग्णाची तपासणी, ऑक्सिजन पातळी न तपासता बेड नसल्याचे कारण सांगून रुग्णाचे बोळवण करण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. वॉर्डात बेड असूनही रुग्णांना कॅज्युअल्टीमध्ये दोन ते तीन तास थांबवून ठेवले जाते किंवा दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनाही आहे. परंतु त्यांच्याकडूनच बेड राखीव ठेवले जात असल्याने सामान्य रुग्ण उपचारांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. यामुळेच की काय, एप्रिल महिन्यात कॅज्युअल्टीमध्ये १२८ रुग्णांचे जीव गेले आहेत.
धक्कादायक म्हणजे, मेडिकलचे ‘सीएमओ’ ओळखीच्या ज्या रुग्णांना ‘आयसीयू’ बेडची गरज नसतानाही ‘आयसीयू’मध्ये ठेवण्याचा प्रकार करीत आहेत. परिणामी, गंभीर रुग्णांना सामान्य वॉर्डात ठेवण्याची वेळ येते. येथे रेमडेसिविर इंजेक्शनसह इतरही महत्त्वाचे औषधोपचार वेळेवर मिळत नाही. यामुळे एप्रिल महिन्यात वॉर्डात ३६५ रुग्णांचे जीव गेले आहेत. या सर्वांची तक्रार थेट संचालक डॉ. लहाने यांच्याकडे झाल्याची माहिती आहे. यामुळे रुग्ण भरतीच्या प्रक्रियेत आता तरी सुधारणा होण्याची शक्यता आहे.