लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटांची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे, असे या बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र नेमक्या किती खाटा वाढणार, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. मेडिकलसह इतर ठिकाणी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीमधून १२७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून कोविड रुग्णांसाठी तात्काळ आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. कोविड रुग्णांसाठी आमदार निवास, पाचपावली तसेच वनामती येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. यापैकी वनामती येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स, विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.
रुग्णांनी अनावश्यक भरती होऊ नये
मागील अनेक महिन्याच्या कालावधीत प्रशासनाने रुग्णालयांमध्ये खाटा वाढविण्यावर भर दिला नाही. मात्र आता कोरोनाबाधितांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती होऊ नये, असे अजब आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भात माहिती जनतेला उपलब्ध होईल. मात्र रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनानुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र बहुतांश रुग्ण वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनेनंतरच भरती होत आहेत याचा प्रशासनाला सोयीस्कररीत्या विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.