लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले आहे. त्यानुसार मेडिकलमध्ये ४०० खाटा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. या वाढीव खाटांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ११ कोटी ७२ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या खाटा रुग्णसेवेत असणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ९१,९८८ वर गेली आहे, तर मृतांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ऑगस्ट महिन्यापासून वेग धरलेल्या बाधित व मृतांच्या संख्येने सप्टेंबर महिन्यात उच्चांक गाठला. मात्र आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्ण व मृतांच्या संख्येत घट आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला काही दिलासा मिळाला आहे. परंतु २५ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्र्यांनी मेडिकलला भेट देऊन कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला असता, त्यांनी खाटा वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. समितीने आठवडाभरात अहवाल सादर केला. यात मेडिकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील १० वॉर्डात प्रत्येकी ४० खाटांच्या सोयीसोबतच २०० डॉक्टर, २०० परिचारिका व १०० कर्मचाऱ्यांसह आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे नमूद केले. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन नुकतेच ११ कोटी ७२ लाखाचा निधी मंजूरही केला. त्यानुसार वॉर्ड क्र. ७ ते ११, वॉर्ड क्र. १४ व वॉर्ड क्र. १७ ते २० हे वॉर्ड रिकामे करून ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे.
३५० एचडीयू तर ५० खाटा आयसीयूच्या असणार
मेडिकलमध्ये कोविडसाठी ६०० खाटा आहेत. आता यात वाढीव ४०० खाटांची भर पडणार आहे. या खाटांमध्ये ३५० खाटा एचडीयू तर ५० खाटा या आयसीयूच्या असणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या निधीतून लवकरच वॉर्ड रुग्णसेवेत सुरू होतील.
डॉ. सजल मित्रा
मेडिकल, अधिष्ठाता