लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये म्युकरमायकोसिसचे १२८ रुग्ण उपचाराखाली असून दरदिवशी ५ ते १० नव्या रुग्णांची भर पडत आहे. परंतु उपचारात प्रभावी असलेल्या ‘अॅम्पोटेरीसीन बी लायपोसोमल’ इंजेक्शन शासनाकडून एक दिवसाआड, त्यातही ८० ते ९० इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात असल्याने रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतच चालले आहेत. सध्या मेडिकलमध्ये या आजाराचे नॉनकोविड ११५ रुग्ण असून, २३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आजाराला नियंत्रणात ठेवणारे ‘अॅम्पोटेरीसिन बी लायपोसोमल’ इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही. दरम्यानच्या काळात आरोग्य विभागाने याची खरेदी व वाटप प्रक्रिया आपल्या हाती घेतली. शासकीय रुग्णालयाची आवश्यकता पूर्ण झाल्यावरच खासगी रुग्णालयांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. परंतु त्यानंतरही सर्वच रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, जून महिन्यापर्यंत या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार असल्याचे मोठे अधिकारी सांगत होते; परंतु दोन महिने होऊनही इंजेक्शनचा तुटवडा आजही कायम आहे.