लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेल्या ३२ विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी एका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती खालावल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांवर पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’मध्ये (पीआयसीयू) उपचार सुरू आहेत. इतर विद्यार्थ्यांना बालरोग विभागाच्या वॉर्ड क्र. ३ मध्ये उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.हुडकेश्वर रोड पवारनगर येथील मारोतराव मुडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अभियानांतर्गत शगुन महिला बचत गटाच्या वतीने शुक्रवारी दुपारी माध्यान्ह भोजन देण्यात आले. जेवल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखणे व मळमळणे सुरू झाले. हळूहळू ही संख्या वाढत गेली. दोन विद्यार्थ्यांना उलट्याही झाल्या. शिक्षकांनी लागलीच शाळेजवळच्या एका खासगी इस्पितळात विद्यार्थ्यांना दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने मेडिकलमध्ये हलविण्यात आले. जे विद्यार्थी शाळेतून घरी गेले होते आणि त्यांना त्रास झाला असे विद्यार्थी नंतर मेडिकलमध्ये उपचारासाठी आले. रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या ३२ वर गेली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन व त्यांच्या डॉक्टरांच्या चमूने तातडीने उपचाराला सुरुवात केली. दोन विद्यार्थ्यांचा रक्तदाब कमी झाल्याने, त्यांना ‘पीआयसीयू’मध्ये दाखल केले होेते. नंतर यातील एका विद्यार्थ्याला व इतरही विद्यार्थ्यांना वॉर्डात स्थानांतरित करण्यात आले. सर्वकाही सामान्य असताना शनिवारी दुपारी १२ वाजता अचानक ‘पीआयसीयू’मध्ये असलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. तातडीने औषधोपचार करण्यात आले. यामुळे खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना शनिवारी होणारी रुग्णालयातून सुटी रद्द करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिरडॉ. जैन यांनी सांगितले, सध्या तरी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना सलाईनमधून औषधोपचार दिला जात आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला ‘पीआयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला ‘मॉनिटरिंग’ केले जात आहे. रविवारी सर्वसामान्य असल्यास विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येईल.पालकांची चिंता वाढलीएका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती ढासळल्याने इतर पालकांची चिंता वाढली. शनिवारी पालकांनी मेडिकलच्या वॉर्ड क्र. ३ समोर गर्दी केली. वॉर्डात मात्र सर्व विद्यार्थी हसत-खेळत असल्याचे पाहत पालकांचे समाधान होत होते. काही पालकांनी डॉक्टरांकडे सुटी देण्याची विनंतीही केल्याचे समजते.माजी पालकमंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेटमाजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दुपारी १ वाजता मेडिकलमध्ये जाऊन विषबाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. सोबतच या प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी व पुन्हा असे गंभीर प्रकार होऊ नयेत, यासाठी काटेकोर उपयायोजना कराव्यात, अशी मागणीही केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी पं.स. सभापती अजय बोढारे, नगरसेवक भगवान मेंढे, डॉ. प्रीती मानमोडे, अजय हाथीबेड, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. दीप्ती जैन, डॉ. शिल्पा लांजेवार, डॉ. मुरारी सिंग उपस्थित होते.
मेडिकल : विषबाधेतील एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:34 AM
माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेल्या ३२ विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी एका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती खालावल्याने खळबळ उडाली.
ठळक मुद्दे३१ विद्यार्थ्यांवर वॉर्डात उपचार