लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या नेत्ररोग विभागात विदर्भातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे या विभागाचा आणखी विकास करणे गरजेचे आहे. नेत्रासंबंधीच्या सर्व चाचण्या व उपचार एकाच ठिकाणी मिळण्यासाठी या विभागासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने ‘नेत्रदान पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान, नेत्रपेढीचे संचालक डॉ. राजेश जोशी आदी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, मरणोत्तर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचे पवित्र काम आपण करू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल, तर जगातून जाताना दोन अंध व्यक्तींना दृष्टीची अमूल्य भेट देऊ या. चांगली दृष्टी असणे हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आ. कोहळे यांनी नेत्ररोग विभागाच्या निरंतर होणाऱ्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व त्यांनी पंधरवड्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. मित्रा यांनी मेडिकलचा विकास व भविष्यात होणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. मदान यांनी बुबूळाच्या आजारामुळे होणाऱ्या अंधत्वाबद्दलची माहिती दिली. बुबुळ प्रत्यारोपणात मेडिकलचा नेत्ररोग विभाग राज्यात अग्रस्थानी असल्याचे सांगून नेत्ररोग विभागात दिवसेगणिक रुग्ण वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान पालकमंत्री बावनकुळे व आ. कोहळे यांनी नेत्रदान जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात डॉ. मदान यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीमध्ये हजारावर विद्यार्थी, डॉक्टर, परिचारिका, एनसीसी छात्र सहभागी झाले होते. रॅली नेत्ररोग विभागापासून ते मेडिकल चौक, क्रीडा चौक ते तुकडोजी महाराज चौक येथून परत मेडिकल कॉलेज परिसरात आली. कार्यक्रमाला डॉ. फिदवी, डॉ. वाय. व्ही. बनसोड, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. नरेश तिरपुडे, डॉ. दीप्ती जैन, मेट्रन डोंगरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. संचालन डॉ. ऐश्वर्या नायक, डॉ. निवेदिता पाटील यांनी केले तर आभार डॉ. सोनाली तांबोळी व डॉ. नम्रता बन्सोडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. राजेश जोशी, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. स्नेहल बोंडे (चौरसिया), डॉ. नीलेश गद्देवार, डॉ. मीनल व्यवहारे, डॉ. निदा रजा, डॉ. वंदना अय्यर यांच्यासह नेत्ररोग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मेडिकलचा नेत्ररोग विभाग अद्ययावत करणार : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 7:10 PM
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात विदर्भातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे या विभागाचा आणखी विकास करणे गरजेचे आहे.या विभागासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
ठळक मुद्देनेत्रदान पंधरवड्याला रॅलीने सुरुवात