सुमेध वाघमारे
नागपूर : मेडिकलच्या त्वचा रोग विभागाचा इमारतीचा सज्जा कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असताना व ‘व्हीएनआयटी’ने सर्वेक्षणात क्षतिग्रस्त भागाची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना केली असतानाही दोन वर्षांपासून शासन याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धोका झाल्यावरच याकडे गांभीर्याने पाहिले जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
१२ डिसेंबर २०१९ रोजी मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या इमारतीचा सज्जा कोसळून एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या घटनेचा धसका घेत तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी बांधकाम विभागाला रुग्णालय इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा सूचना दिल्या. बांधकाम विभागाने याची जबाबदारी ‘व्हीएनआयटी’कडे सोपविली. या सर्वेक्षणात पेईंग वॉर्डच्या बाजूने व स्वच्छता निरीक्षक कार्यालयालगत गेलेल्या पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर जाणाऱ्या पायरीचा भाग क्षतिग्रस्त असल्याचे आढळून आले. याची सूचना त्यांनी अधिष्ठात्यांना देऊन तातडीने दुरुस्तीचा अहवाल दिला. बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरुपात पेईंग वॉर्ड भागातील पायऱ्यांवरून कोणी जाऊ नये यासाठी लोखंड व लाकडाच्या मदतीने हा भाग बंद केला. हा भाग पडू नये म्हणून लोखंडी खांबाने आधारही देण्यात आला. परंतु नंतर याकडे दुर्लक्ष झाले. दोन वर्षे होत असतानाही कोणतीही डागडुजी झाली नाही. या दरम्यान ‘ओटी ई’ व ‘ओटी एफ’कडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने नंतर मेडिकलच्याच कर्मचाऱ्यांनी तर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी कठडे हटवून मार्ग मोकळा केला. परंतु आजही सज्जा पडू नये म्हणू लोखंडी खांब उभे आहेत. या भागातून रुग्ण व नातेवाईकांची सतत ये-जा असते. सध्या पावसाचे वातावरण त्यात लोखंडी खांबही गंजल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
-नेत्र रोग विभागाची इमारतही धोकादायक
नेत्ररोग विभागाच्या ओपीडी इमारतीला लागून असलेली इमारतही धोकादायक असल्याचे ‘व्हीएनआयटी’ने कळविले आहे. सध्या ही इमारत बंद असलीतरी या परिसरात रुग्ण व त्यांचे नातेवाईक बसून राहत असल्याने अनुचित घटनेची शक्यता आहे.
-दुरुस्तीसाठी ४६ लाख रुपयांची तरतूद
‘व्हीएनआयटी’ने केलेल्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’नुसार पेईंग वॉर्ड भागातील पायऱ्यांच्या भागातील व इतरही भागातील दुरुस्तीसाठी चालू आर्थिक वर्षात शासनाने ४६ लाखांची तरतूद केली आहे. परंतु जोपर्यंत यातील १० टक्के निधी मेडिकलच्या तिजोरीत जमा होत नाही तोपर्यंत बांधकामाची निविदा काढता येत नाही. या संदर्भात मेडिकल प्रशासनाला पत्र दिले आहे. निधी मिळताच लवकरच बांधकामाला सुरुवात होईल.
- संजय जयस्वाल, बांधकाम विभाग, मेडिकल