नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवार १६ जानेवारीपासून शहर व ग्रामीणमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ लसीचे बुधवारी मध्यरात्री ४२ हजार डोस उपलब्ध झाले, तर शुक्रवारी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे २ हजार डोस उपलब्ध झाले असून, याचा साठा मेडिकलला पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोविशिल्ड लसीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत, तर कोव्हॅक्सिन लसीचे तिसरा टप्पा अद्यापही सुरू आहे. यामुळे कोव्हॅक्सिन लस देताना लाभार्थ्याची मंजुरी घेतली जाणार आहे. यामुळे या लसीबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी शहर व ग्रामीण मिळून ३६ हजार १४५ कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. प्रतिव्यक्ती दोन डोस, यानुसार ७२ हजार २९० हजार डोज गरज होती. मात्र, ‘कोविशिल्ड’चे ४२ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यातील शहरसाठी १० हजार प्रतिव्यक्ती दोन डोसनुसार २० हजार, तर ग्रामीण भागासाठी ७ हजार ८०० प्रतिव्यक्ती दोन डोसनुसार १५ हजार ६०० डोज उपलब्ध झाले आहेत. शहर आणि ग्रामीण मिळून प्रत्येकी १० टक्के म्हणजे २ हजार डोस अतिरिक्त देण्यात आले आहेत. कमी डोस मिळाल्याची नाराजी सुरू असताना, आज दुपारी कोव्हॅक्सिनचे २ हजार डोज शासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) मिळाले, परंतु लसीकरणामध्ये एकाला कोविशिल्ड तर दुसऱ्याला कोव्हॅक्सिन दिली जाणार असल्याने कोणती चांगली याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
-कोव्हॅक्सिन’ चाचणीचा तिसरा टप्पा सुरूच
कोविशिल्ड’चा मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे, परंतु ‘कोव्हॅक्सिन’चा मानवी चाचणीचा तिसरा टप्पा अद्यापही सुरूच आहे, परंतु केंद्रीय औषध मानक नियंत्रण परिषदेने या दोन्ही लसीला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. चाचणी सुरूच असल्याने, ‘कोव्हॅक्सिन’ देताना लाभार्थ्याची मंजुरी घेणे आवश्यक असल्याची अट टाकली आहे. यामुळेच संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. मेडिकलमध्ये शनिवारी ही लस तेथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांना दिली जाणार आहे. किती लोक सामोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, अनेक डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस लाभदायक असल्याचे सांगितले आहे.
-रात्री उशिरापर्यंत कुणालाच मॅसेज नाही
पहिल्या टप्प्यात ‘फ्रंट लाइन हेल्थ वर्कर’ यांना लस दिली जात आहे. त्यांची नावे ‘कोविन’ अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. शहरात ५ तर ग्रामीणमध्ये ७ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रावर दिवसभरात जवळपास १०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानुसार, शहरात ५०० लाभार्थ्यांना लस मिळणार आहे, परंतु रात्री ८ वाजेपर्यंत अनेक लाभार्थ्यांना शनिवारच्या लसीकरणाचा मॅसेजच आला नाही. यामुळे त्यांच्यामध्येही संभ्रमाचे वातावरण होते.
-दोन्ही लसी जवळपास सारख्याच
: दोन्ही लसीची एक्सपायरी डेट सहा महिन्यांची आहे
: दोन्ही लसीला २-८ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावे लागते
: दोन्ही लसीचा ‘०.५’एमएल डोस लाभार्थ्यांना दिला जातो.
: दोन्ही लसींचा २८ दिवसांनंतर दुसरा बुस्टर डोज दिला जातो
: दोन्ही लसींचा १८ वर्षांखालील मुलांना डोज दिला जात नाही
: दोन्ही लसींचा गर्भवती किंवा प्रसूती झालेल्यांना लस दिली जात नाही
: बाहेरच्या तापमानात लस ठेवल्यास दोन्ही लस खराब होतात
: दोन्ही लसींचा यशस्वितेचा दर ७० टक्क्यांवर
- दोन लसींमध्ये हा फरक
: कोविशिल्डचा एका व्हायलमध्ये १० डोस असतात
: कोव्हॅक्सिचा एका व्हायलमध्ये २० डोस असतात
: कोविशिल्डमध्ये ‘व्हायरल व्हेक्टर टेक्नॉलॉजी’
: कोव्हॅक्सिनमध्ये ‘इनअॅक्टिव्हेटेड व्हायरस’
: कोविशिल्ड चाचणीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत
: कोव्हॅक्सिन चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे
: कोव्हॅक्सिन लस देताना लाभार्थ्याची मंजुरी घेऊनच दिली जाणार
: कोविशिल्ड लस देताना लाभार्थ्याची मंजुरीची गरज नाही