मेडिकलची रोबोटिक सर्जरी वादात, सिस्टिम खरेदी आदेशाला आव्हान
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 19, 2024 03:50 PM2024-02-19T15:50:18+5:302024-02-19T15:50:32+5:30
इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया कंपनीची हायकोर्टात याचिका
नागपूर : मध्य भारतातील गरजू नागरिकांचा आधारस्तंभ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)करिता रोबोटिक सर्जरी सिस्टिम खरेदी करण्याचा आदेश वादात सापडला आहे. बेंगळुरू येथील इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया कंपनीने या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
रोबोटिक सर्जरी सिस्टिम खरेदीच्या टेंडरमध्ये इंटुईटिव्ह सर्जिकल इंडिया, गुरुग्राम येथील सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन व रायपूर येथील बागरी एंटरप्राईज या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामधून सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन कंपनीला ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सिस्टिम खरेदीचा आदेश जारी करण्यात आला. त्यावर इंटुईटिव्ह कंपनीचा आक्षेप आहे.
मेडिकल अधिष्ठात्यांनी सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी अधिकार नसताना टेंडरच्या अटी शिथिल केल्या. सुधीर श्रीवास्तावसह बागरी एंटरप्राईजही या टेंडरकरिता पात्र नाही. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना अपात्र घोषित करून वादग्रस्त खरेदी आदेश रद्द करण्यात यावा, असे इंटुईटिव्ह कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय कंपनीने स्वत:ला खरेदी आदेश देण्याची मागणी केली आहे. या सिस्टिमसाठी २० कोटी ६२ लाख ४२ हजार ९६२ रुपये मिळाले आहेत. परंतु, विविध कारणांमुळे सिस्टिमची खरेदी २०१८ पासून रखडली आहे.
मेडिकल अधिष्ठात्यांना नोटीस जारी
याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मेडिकल अधिष्ठाता, सुधीर श्रीवास्ताव इनोव्हेशन व बागरी एंटरप्राईज यांना नोटीस बजावून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड. एम. जी. भांगडे व ॲड. रितेश बढे यांनी कामकाज पाहिले.