लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या पॅथोलॉजी विभागात अद्य.यावत यंत्र, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मोठे मनुष्यबळ असताना येथील रुग्णांचे नमुने खासगी लॅबमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. विशेषत: दुपारी २ वाजेनंतर वॉर्डातील किंवा अपघात विभागातील बहुसंख्य रुग्णांचे नमुने घेण्यासाठी चक्क खासगी लॅबचे एजंट येतात. परिणामी, गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या या रुग्णालयाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे गरजेचे असते. म्हणूनच मेडिकलमध्ये पॅथाॅलॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. या तीनही लॅब मिळून ६० वर मनुष्यबळ आहे. तिन्ही विभागात अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असताना मागील काही दिवसांपासून दुपारी २ वाजल्यानंतर ‘सीबीसी’सारख्या सामान्य चाचणीसाठी रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठविले जात आहे. या शिवाय, हृदयविकाराच्या झटक्याची चाचणी ‘सीपीके-एमबी’ तर विष प्राशन केलेल्या रुग्णाच्या शरीरातील विषाची तीव्रता माहिती करून घेणारी ‘कोलाईनइर्स्टस’ या दोन महत्त्वाच्या चाचण्यांसह इतरही चाचण्या होत नाहीत. परिणामी, मेडिकलमधील रुग्णाच्या तातडीच्या उपचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
खासगी लॅबच्या एजंटला जातात फोन
दुपारनंतर वॉर्डातील किंवा अपघात विभागातील रुग्णांची चाचणी करायची असल्यास वॉर्डातून विशिष्ट व्यक्तीचा फोन खासगी लॅबच्या एजंटला जातो. तोच रुग्णाचा रक्ताचे नमुने घेतो, पैसे घेतो आणि अहवालही आणून देतो. या मागे मोठे अर्थकारण असल्याचे बोलले जाते. बाहेरचा एजंट वॉर्डात येतोच कसा, हा प्रश्न आहे.
ॲन्टिबायोटिक्स व ग्लोव्हजसाठीही रुग्णांना बाहेरचा रस्ता
मेडिकलमध्ये अनेक ॲन्टिबायोटिक्सचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांवर या औषधी बाहेरून विकत घेण्याची वेळ आली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून हॅण्ड ग्लोव्हजही उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून विकत घेऊन येण्यास सांगितले जात आहे.